Vehicle sales decline in May
पुणे: एप्रिल महिन्याच्या तुलनेत मे महिन्यात दुचाकी, चारचाकी आणि व्यावसायिक वाहनांच्या विक्रीत घट झाली आहे. तीन चाकी वाहनांच्या विक्रीत वाढ झाली. मात्र, दुचाकी आणि चार चाकी, या प्रमुख श्रेणीतील वाहन विक्री घटल्याने एकूण मासिक वाहन विक्रीत 3.33 टक्क्यांनी घट झाली आहे.
एप्रिल महिन्यात सर्व श्रेणीतील 22 लाख 89 हजार 2 वाहने रस्त्यावर आली होती. मे महिन्यात हा आकडा 22 लाख 12 हजार 809 वर घसरला आहे. तर, मे 2024मध्ये 21 लाख 5 हजार 153 वाहने रस्त्यावर आली होती. त्या तुलने यंदाच्या मे महिन्यात एकूण वाहन विक्री 5.11 टक्क्यांनी वाढली आहे. (Latest Pune News)
एप्रिल महिन्याच्या तुलनेत दुचाकीची विक्री मे महिन्यात 16 लाख 86 हजार 774 वरून 16 लाख 52 हजार 637वर (2 टक्के घट) आली आहे. मे-2024मध्ये 15 लाख 40 हजार 77 दुचाकी रस्त्यावर आल्या होत्या. त्यातुलनेत यंदा दुचाकींची विक्री 7.31 टक्क्यांनी वाढली आहे. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डिलर्स असोसिएशनने (एफएडीए) ही आकडेवारी दिली आहे.
एप्रिल महिन्याच्या तुलनेत मे महिन्यात कारची विक्री 3 लाख 49 हजार 939 वरून 3 लाख 2 हजार 214वर घसरली आहे. जवळपास 13.64 टक्क्यांनी कार विक्री खाली आली आहे. मे-2024मध्ये 3 लाख 11 हजार 908 कार रस्त्यावर आल्या होत्या. त्या तुलनेतही यंदा कार विक्री 3.11 टक्क्यांनी घसरली आहे.
एप्रिल महिन्याच्या तुलनेत मे महिन्यात लहान-मोठ्या ट्रकची विक्री 85,203 वरून 75,615 वर आली आहे. ट्रक विक्री 11.25 टक्क्यांनी घटली आहे. मे-2024मध्ये 78,530 ट्रक रस्त्यावर आले होते. त्यातुलनेतही विक्रीत 3.71 टक्क्यांनी घट झाली आहे. तीनचाकी वाहनांची विक्री एप्रिलच्या तुलनेत मे महिन्यात 99,766 वरून 1 लाख 4 हजार 448वर गेली आहे.
इलेक्ट्रिकमध्ये तीनचाकींचा वाटा अधिक
मे महिन्यात 1 लाख 4 हजार 448 तीनचाकी वाहनांची विक्री झाली. त्यातील 63.21 टक्के वाहने इलेक्ट्रिक आहेत. तर, 16 लाख 52 हजार 637 दुचाकींपैकी 6.07 टक्के इलेक्ट्रिक आहेत. याशिवाय 3 लाख 2 हजार 214 प्रवासी कारमधील इलेक्ट्रिकचा वाटा 4.07 टक्के आहे.
ट्रक्टरच्या विक्रीत 18 टक्कयांनी वाढ...
एप्रिल महिन्याच्या तुलनेत मे महिन्यात ट्रॅक्टरची विक्री 60,915 वरून 71,992वर गेली आहे. ट्रॅक्टरच्या विक्रीत मासिक तब्बल 18.18 टक्क्यांची वाढ झाली आहे. मे-2024मध्ये 70 हजार 63 ट्रॅक्टरची विक्री झाली होती. गतवर्षीच्या तुलनेत त्यात 2.75 टक्क्यांनी वाढ झाली आहे.