Bar Council of India Pudhari
पुणे

Maharashtra Law College BCI Approval: धक्कादायक! राज्यातील १०३ विधी महाविद्यालयांकडे बार कौन्सिलची मान्यता नाही; विद्यार्थ्यांना दिलासा

सीईटी प्रवेश प्रक्रिया सुरूच राहणार; महाविद्यालयांना BCI मान्यता मिळवण्यासाठी सहा महिन्यांची मुदत

पुढारी वृत्तसेवा

पुणे: राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. परंतु राज्यातील शंभरहून अधिक विधी महाविद्यालयांकडे बार कौन्सिल ऑफ इंडियाची मान्यता नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विद्यार्थीहित लक्षात घेता संबंधित महाविद्यालयांना बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या मान्यतेसाठी सहा महिन्यांची मुदत देण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

सीईटी सेलच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये महाविद्यालयांना सामावून घेण्यापूर्वी त्यांच्याकडे शासनमान्यता, विद्यापीठ मान्यता आणि बार कौन्सिल ऑफ इंडियाची मान्यता आहे किंवा नाही या बाबी काटेकोरपणे तपासल्या जात आहेत. तसेच शिक्षणशास्त्र महाविद्यालयांसाठीसुद्धा हाच नियम लावण्यात आला आहे.

राज्यात विधी अभ्यासक्रमाची एकूण 352 महाविद्यालये आहेत. या सर्व महाविद्यालयांकडे बार कौन्सिल ऑफ इंडियाची मान्यता असणे आवश्यक आहे. परंतु, राज्यातील 352 पैकी 103 महाविद्यालयांकडे बार कौन्सिल ऑफ इंडियाची मान्यता नसल्याचे समोर आले. त्यावर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी संबंधित महाविद्यालयांना बार कौन्सिल ऑफ इंडियाची मान्यता आणण्यासंदर्भात सूचना दिल्या आहेत.

सीईटी प्रवेश प्रक्रियेत संबंधित महाविद्यालयांना सामावून न घेण्याचा निर्णय घेतला असता तर विधी अभ्यासक्रमाच्या जागा घटल्या असत्या. परिणामी हजारो विद्यार्थी विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेशापासून वंचित राहिले असते. त्यामुळे शासनाने संबंधित महाविद्यालयांना बार कौन्सिल ऑफ इंडियाची मान्यता घेण्यासाठी सहा महिन्यांची मुदत दिली आहे. त्यामुळे

विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे, उच्चशिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी नियमानुसार कार्यवाही करण्याबाबत यामध्ये लक्ष घातले आहे. परंतु, यामुळे कायद्याचे शिक्षण देणाऱ्या संस्थाच नियम मोडत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT