Marathi Sahitya Sammelan 2027 pudhari photo
पुणे

100th Marathi Sahitya Sammelan: शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २७ ते ३० जानेवारीला; तारखांमध्ये बदल

पुणे ग्रँड टूरमुळे संमेलनाचा समारोप एक दिवस आधी; आज संमेलनाध्यक्षांची निवड होणार, लिंबाळे आणि बाबा भांड यांच्या नावांची चर्चा

पुढारी वृत्तसेवा

पुणे: शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तारखांमध्ये बदल केला असून, आता हे संमेलन २७ ते ३० जानेवारी २०२७ या कालावधीत होणार आहे. यापूर्वी संमेलन २८ ते ३१ जानेवारीदरम्यान आयोजित करण्याचे नियोजन होते. मात्र, ३१ जानेवारी रोजी पुण्यात पुणे ग्रँड टूर २०२७ या सायकलिंग स्पर्धेचा समारोप होणार असून, त्यामुळे वाहतूक, नियोजन आणि अन्य व्यवस्थांचा विचार करून संमेलनाचा समारोप एक दिवस आधी म्हणजेच ३० जानेवारीला करण्याचा निर्णय साहित्य महामंडळाच्या मार्गदर्शक समितीच्या बैठकीत सोमवारी (दि.२३) घेतला आहे.

दरम्यान, संमेलनाच्या नियोजनासाठी झालेल्या या बैठकीत संपूर्ण संमेलनाचा कार्यक्रम आराखडा, ध्वजवंदन, परिसंवादांची रूपरेषा आणि विविध कार्यक्रमांच्या आयोजनासंदर्भातही चर्चा केली. टिळक रस्त्यावरील महाराष्ट्र साहित्य परिषदेत मार्गदर्शक समितीची बैठक झाली. संमेलनाच्या चार दिवसांतील कार्यक्रमांचे स्वरूप कसे असावे, कोणत्या दिवशी कोणते कार्यक्रम घ्यावेत, परिसंवाद किती आयोजित करावेत, यावर बैठकीत विचारविनिमय करण्यात आला.

बैठकीला मार्गदर्शक समितीतील शुभदा फडणीस (नागपूर), दादा गोरे (छत्रपती संभाजीनगर), उज्ज्वला मेहेंदळे (मुंबई) यांच्यासह साहित्य महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोमण, उपाध्यक्ष पुरुषोत्तम सप्रे, प्रमुख कार्यवाह स्वाती महाळंक, कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर, संमेलनाची संयोजक संस्था असलेल्या समर्थ युवा फाउंडेशनचे राजेश पांडे आणि बागेश्री मंठाळकर उपस्थित होते.

आज संमेलनाध्यक्षांची निवड

संमेलनाध्यक्ष निवडीचा महत्त्वाचा निर्णय आज म्हणजेच मंगळवारी (दि. २४) होणाऱ्या बैठकीत घेतला जाणार आहे. अध्यक्षपदासाठी डॉ. शरणकुमार लिंबाळे, ज्येष्ठ विचारवंत डॉ. शेषराव मोरे, लेखक - अनुवादक चंद्रकांत भोंजाळ, कवी प्रवीण दवणे, ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर, लेखक रमेश पतंगे आणि ज्येष्ठ लेखक बाबा भांड यांच्यासह आणखी काही नावांची चर्चा आहे. त्यात डॉ. लिंबाळे आणि भांड यांची नावे आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या बैठकीकडे साहित्य वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

यंदाचे संमेलन साधेपणाने?

राज्यावरील दुष्काळाच्या सावटामुळे शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वैचारिक समृद्धीसह साधेपणाने साजरे करण्याचा विचार पुढे आला असून, त्यावर साहित्य महामंडळाच्या बैठकीत मंगळवारी (दि.२४) चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. दरम्यान, साहित्य संमेलनासाठी सरकारने जाहीर केलेले पाच कोटी रुपयांचे अनुदान दसऱ्याला जमा होणार होते. पण, अद्याप ही रक्कम महामंडळाला मिळालेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT