रेल्वे स्थानकावर चाइल्ड ‘रेस्क्यू’ @100; 'आरपीएफ'च्या तत्परतेमुळे चिमुकले सुखरूप File Photo
पुणे

Pune: रेल्वे स्थानकावर चाइल्ड ‘रेस्क्यू’ 100; 'आरपीएफ'च्या तत्परतेमुळे चिमुकले सुखरूप

चार महिन्यांच्या कालावधीत पुणे रेल्वे स्थानकावर 94 मुले आणि 6 मुली असे एकूण 100 चिमुकले पालकांपासून हरवली होती.

पुढारी वृत्तसेवा

पुणे: प्रचंड गर्दी, उडालेला गोंधळ, पालकांचे क्षणभराचे दुर्लक्ष अन् सुटलेल्या चिमुकल्यांचे हात अन् उरतो फक्त आक्रोश, अश्रू... पुणे रेल्वे स्थानकावर अशा अनेक हृदयद्रावक क्षणांचे साक्षीदार ठरलेल्या 100 चिमुकल्या जिवांना गेल्या चार महिन्यांत पुणे रेल्वे स्थानकावर आरपीएफकडून रेस्क्यू करून त्यांना त्यांच्या पालकांच्या कुशीत सुखरूप पोहचवण्यात आले आहे.

पुणे रेल्वे स्थानकावरील गर्दीत हरवलेली, रागाने पालकांना सोडून आलेली यांसह अनेक कारणांनी पुणे रेल्वे स्थानकावर सापडलेल्या चिमुकल्यांना परत घरी पोहचवल्यामुळे पालकांनी आरपीएफचे (रेल्वे सुरक्षा बल) आभार मानले आहेत. (Latest Pune News)

दि. 1 जानेवारी ते 27 एप्रिल 2025 या चार महिन्यांच्या कालावधीत पुणे रेल्वे स्थानकावर 94 मुले आणि 6 मुली असे एकूण 100 चिमुकले पालकांपासून हरवली होती. या बालकांना आरपीएफ (रेल्वे सुरक्षा बल) आणि रेल्वे प्रशासनाच्या सतर्कतेने तत्काळ शोधून पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. याची नोंद रेल्वे सुरक्षा बलाकडून करण्यात आली. दै. ‘पुढारी’शी बोलताना नुकतीच ही माहिती आरपीएफ अधिकार्‍यांनी दिली.

...अशी केली जाते मदत

हरवलेली मुले रडत, घाबरलेल्या अवस्थेत रेल्वे स्थानकावर सापडतात. अशा वेळी त्यांना विश्वासात घेणे, ओळख पटवून पालकांशी संपर्क साधणे आणि सुखरूप परत पाठवण्याचे काम आरपीएफ ‘साथी’ संस्थेच्या मदतीने दिवस-रात्र करत आहेत. रेल्वे स्टेशनवरील सीसीटीव्ही आणि तत्पर कर्मचारी यांची मदत घेऊन हे रेस्क्यू ऑपरेशन यशस्वीपणे पार पडत आहे. पालक येईपर्यंत मुलांना संस्थेच्या ताब्यात ठेवले जाते. पालक आल्यावर ओळख पटवून योग्य ती कागदोपत्री कार्यवाही करून त्यांना पालकांकडे सोपवले जाते.

गर्दीच्या वेळी विशेषतः आत्ता सुरू असलेल्या उन्हाळी सुट्यांमध्ये पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशा वेळेस क्षणभराच्या दुर्लक्षाने चिमुकली मुले प्लॅटफॉर्मवर, स्थानक परिसरात हरवू शकतात. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. गर्दीच्या वेळी काही सेकंदांचे दुर्लक्षही अशा घटना घडण्यास कारणीभूत ठरू शकतात. तसेच, पालकांनीही मुलांना रागावू नये, त्यांना समजून घ्यावे, ज्यामुळे मुले रागाने घर सोडणार नाहीत. आम्ही रेल्वे स्थानकावर सतर्क आहोतच, पण पालकांनीसुद्धा खबरदारी घ्यायला हवी.
- सुनील यादव, निरीक्षक, रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ, पुणे)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT