

पुणे: पुणे महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना ‘हायटेक’ शिक्षण देण्यासाठी कोट्यवधी खर्चून तयार केलेली ई-लर्निंग यंत्रणा बंद पडली आहे. यामुळे मुलांना आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण देण्याच्या योजनेला हरताळ फासला गेला आहे. या प्रकाराची माहिती पालिकेच्या अधिकार्यांना असूनदेखील ही यंत्रणा नेमकी का बंद पडली? याची माहिती नसल्याचे स्पष्टीकरण देखील अधिकार्यांनीच दिले.
पुणे महानगरपालिकेने मोठा गाजावाजा करीत 2017 मध्ये ई-लर्निंग यंत्रणा सुरू केली. ही यंत्रणा 265 शाळांमध्ये सुरू करण्यात आली होती. यासाठी तब्बल 20 कोटी 99 लाख रुपये खर्च करण्यात आले होते. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे सत्र तसेच विविध विषयांवरील माहिती देण्यासाठी पालिकेने आकाशवाणीच्या धर्तीवर स्टुडिओ देखील उभारला. (Latest Pune News)
मात्र, ही यंत्रणाच बंद पडल्याने स्टुडिओसह सर्व यंत्रणा धूळ खात पडली आहे. इंटरनेटची सुविधाच नसल्याने ही यंत्रणा बंद पडल्याचे प्रशासनातील एका अधिकार्याने मान्य केले आहे. रिलायन्स जिओने देशभरातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि पालिकांच्या शाळांना मोफत इंरटनेट सेवा देण्याची घोषणा केली होती.
महापालिकेने देखील पाठपुरावा करीत शाळांमध्ये ई-लर्निंग शिक्षण देण्यासाठी इंटरनेट घेतले होते. महापालिकेच्या विविध माध्यमांच्या 265 शाळांमध्ये ई-लर्निंग शिक्षण सुरू करण्यात आले होते. गरीब कुटुंबांतील सुमारे एक लाख विद्यार्थी यातून शिक्षण घेत होते. मात्र, ही यंत्रणा बंद असल्याने त्यांना आता पारंपरिक पद्धतीने शिक्षण घेण्याची वेळ आली आहे.
केवळ इंटरनेट सेवा नसल्याने शिक्षण बंद
गेल्या सात ते आठ वर्षांपासून ई-लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण देण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून प्रत्येक इयत्तेनुसार अभ्यासक्रमाचे सॉफ्टवेअर तयार करण्यात आले होते. 265 शाळांतील वर्गखोल्यांमध्ये टीव्ही संच (स्क्रीन) तसेच शाळांसाठी संगणक देखील यासाठी उपलब्ध करून देण्यात आले होते.
सुरुवातीला बीएसएनएलद्वारे इंटरनेट पुरविले जात होते. कोरोना काळात शाळा बंद असल्याने ही सेवा काहीशी ठप्प पडली होती. मात्र, शाळा सुरू झाल्यावर ही यंत्रणा सुरू करणे अपेक्षित असताना केवळ इंटरनेट सेवा नसल्याने संपूर्ण शहरातील ई-लर्निंग शिक्षण बंद असल्याची माहिती महापालिकेच्या प्रशासनाने दिली.
महापालिकेची उदासीनता
पालिकेने शाळांमध्ये जिओच्या माध्यमातून इंटरनेट सेवा घेऊन ही यंत्रणा सुरू ठेवणे अपेक्षित होते. मात्र, केवळ प्रशासनाच्या उदासीनतेमुळे ही यंत्रणा धूळ खात पडून आहे. थोडक्यात, पालिकेने कोट्यवधी रुपयांचा केलेला खर्च वाया गेल्याने पालकांनी संताप व्यक्त केला आहे.
पालिकेतील विविध विभागांचा आढावा घेतला. पालिकेच्या शाळांमध्ये विविध उपक्रम राबविण्यात येतात. यंदा विद्यार्थ्यांसाठी विशेष उपक्रम राबविण्यासंदर्भात चर्चा केली. ई-लर्निंग यंत्रणेबाबत देखील चर्चा झाली असून, ही यंत्रणा बंद असल्याची माहिती विभागप्रमुखांनी दिली. ही यंत्रणा का बंद आहे? याचे कारण त्यांनी सांगितले नाही. याबाबत अद्याप मला देखील पुरेशी माहिती नाही. यंदाच्या शैक्षणिक वर्षात ही यंत्रणा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
- एम. जे. प्रदीप चंद्रन, अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका