पुणे: पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) शहरातील तब्बल १० लाखांहून अधिक शालेय विद्यार्थ्यांना रस्ते सुरक्षा नियमांचे महत्त्व पटवून देण्यासाठी कंबर कसली आहे. 'रोड सेफ्टी ट्रेक' या त्यांच्या नविनतम उपक्रमाद्वारे, लहान वयातच विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक नियमांविषयी जागरूकता रुजवली जाणार आहे. येत्या १ जूनपासून सुरू होणाऱ्या या कार्यक्रमात इयत्ता ५ वी ते १० वीचे विद्यार्थी सहभागी होतील.
आरटीओ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहरात जवळपास ८ हजार शाळा असून विद्यार्थ्यांची संख्या १० लाखांच्या वर आहे. या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून त्यांना रस्ते सुरक्षेचे शिक्षण देणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. दर शनिवारी दिवेघाट येथे या कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल आणि एका दिवसात सुमारे ६०० विद्यार्थी यात सहभागी होतील. (Latest Pune News)
निसर्गरम्य वातावरणात खेळ आणि मनोरंजनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना रस्ते सुरक्षा नियमांची माहिती दिली जाईल. सासवड येथील एका शाळेतील विद्यार्थ्यांसोबत हा उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर करण्यात आला आहे आता तो संपूर्ण शहर आणि जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी राबवण्याचा आरटीओ अधिकाऱ्यांचा मानस आहे.
शिक्षण विभागाच्या आदेशाप्रमाणे दर शनिवारी विद्यार्थ्यांचा "नो बॅगेज डे" असतो, त्याच दिवशी आरटीओ कडून दिवेघाट येथील 6 हजार देशी-विदेशी झाडांचे विद्यार्थ्यांना पर्यटन ट्रेक घडविण्यात येणार आहे. त्यानंतर येथेच आरटीओ कडून क्लासरूम तयार करण्यात आली आहे. या क्लासरूम मध्ये विद्यार्थ्यांना रस्ते सुरक्षा बाबत जनजागृती करण्यात येणार आहे.
तसेच येथील हॉलमध्ये विद्यार्थ्यांसोबत रस्ते सुरक्षेबाबत मार्गदर्शन करणारी सापशिडी व अन्य गेम्स खेळून त्यांना मार्गदर्शन आणि प्रशिक्षण दिले जाणार आहे. हा उपक्रम राबवण्यामागे प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांची संकल्पना असून, विद्यार्थ्यांना लहान वयापासूनच रस्ते सुरक्षेचे महत्त्व पटवून देणे, हेच हा त्यांचा उद्देश आहे.
या उपक्रमात केवळ विद्यार्थीच नव्हे, तर स्कूल बस चालकांनाही प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यांना आग विझवणारे यंत्र कसे हाताळावे आणि आपत्कालीन परिस्थितीत काय करावे, याचे ज्ञान देण्यात येईल. प्रत्येक विद्यार्थ्याला रस्ते सुरक्षा किट मिळेल, ज्यात दिशादर्शक, स्टिकर्स, शुभेच्छापत्रे आणि महत्त्वाचे रस्ते सुरक्षा संदेश असलेले फ्रेंडशिप बँड असतील.
महत्त्वाचे मुद्दे -
१० लाखांहून अधिक विद्यार्थी: पुणे शहरातील १० लाखांहून अधिक विद्यार्थी घेणार रस्ता सुरक्षेचे धडे.
'रोड सेफ्टी ट्रेक' उपक्रम: पुणे आरटीओचा विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाकांक्षी 'रोड सेफ्टी ट्रेक' उपक्रम.
१ जून पासून सुरुवात: उपक्रमाची सुरुवात - जून पासून होणार.
इयत्ता ५ वी ते १० वी: इयत्ता ५ वी ते १० वीचे विद्यार्थी होणार सहभागी.
दर शनिवारी आयोजन: दिवेघाट येथे दर शनिवारी कार्यक्रमाचे आयोजन.
खेळ आणि मनोरंजनातून शिक्षण: निसर्गरम्य वातावरणात मनोरंजक पद्धतीने रस्ते सुरक्षा शिक्षण.
चालकांसाठी विशेष प्रशिक्षण: स्कूल बस चालकांना आपत्कालीन परिस्थितीत मदतीचे प्रशिक्षण.
सुरक्षा किटचे वाटप: प्रत्येक विद्यार्थ्याला रस्ते सुरक्षा संदेशासह किट मिळणार
"लहान वयात शिकलेले ज्ञान कायमस्वरूपी विद्यार्थ्यांच्या लक्षात राहते. त्यामुळे या वयात विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांविषयी माहिती देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. 'रोड सेफ्टी ट्रेक' च्या माध्यमातून आम्ही एक अशी पिढी तयार करत आहोत, जी स्वतः तर नियमांचे पालन करेलच, पण इतरांनाही त्यासाठी प्रोत्साहित करेल. पुणे शहरातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून त्यांना सुरक्षित वाहतुकीचे महत्त्व पटवून देणे हे आमचे ध्येय आहे."- अर्चना गायकवाड, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे