विरार (पालघर) ; पुढारी वृत्तसेवा : मुंबई- अहमदाबाद महामार्गावरील पीरकुंडा दर्गा परिसरात एका महिलेचे बॅगमध्ये शीर सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी मांडवी पोलिसांनी धाव घेऊन महिलेचे शीर ताब्यात घेतले आहे. यासंदर्भात गुन्हा दाखल केला आहे.
गुरूवारी ( दि. १३) रोजी सायंकाळी काही तरुणांचा ग्रुप होळीच्या निमित्ताने मज्जा करत होते. याचदरम्यान विरार येथील पीरकुंडा दर्ग्यासमोर ते लघुशंकेसाठी गेले असता त्याठिकाणी त्यांना मोठी बॅग दिसून आली. बॅगेची तपासणी केली असता त्यांना बॅगमध्ये महिलेची शरीराची कवटी दिसून आली. त्यांनी तात्काळ यासंदर्भात जवळ असलेल्या मांडवी पोलिसांना याची माहिती दिली.
मांडवी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची पाहणी केली. पोलिसांना घटनास्थळी अजून एक बॅग सापडली आहे. त्यामध्ये काही वस्तूदेखील त्यांना आढळून आल्या आहेत. पोलिसांच्या शोधात ही कवटी महिलेची असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याच परिसरात महिलेचे शरीराचे अन्य तुकडे टाकले असल्याचे माहिती समोर येत आहे. या परिसरात शोध मोहीम सुरू केली असून महिलेचे शरीराचे अन्य तुकडे शोधण्याचे काम मांडवी पोलीस करत आहेत.