बोईसर ः बोईसर बस डेपो परिसरातून पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत तीन किलो गांजासह 51 वर्षीय महिलेला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव सविता शिव बहादुर सिंग (बोईसर) असे आहे. या प्रकरणी बोईसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास सुरू आहे. बस डेपो परिसरात गांजाची वाहतूक व विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली आहे.
नुकतेच बोईसर पोलीस ठाण्याच्या निरीक्षकपदाचा पदभार स्वीकारलेल्या सुनिल जाधव यांच्यासमोर अंमली पदार्थांच्या वाढत्या व्यवसायावर लगाम घालण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. औद्योगिक वसाहतींमुळे तसेच नव्याने येऊ घातलेल्या मोठ्या प्रकल्पांमुळे बोईसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोकसंख्या झपाट्याने वाढत असून, परप्रांतीयांचे लोंढेच्या लोंढे येथे येत आहेत. परिणामी, अनेक असंवैधानिक धंद्यांना खतपाणी मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
या पार्श्वभूमीवर, बोईसर परिसरातील ग्रामीण भागासाठी स्वतंत्र पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस प्रशासनाने ठोस व सातत्यपूर्ण कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.