पालघर : मेल एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात पश्चिम रेल्वेने बदल केला असून यामुळे डहाणू - चर्चगेट आणि विरार- डहाणू लोकल सेवेचे वेळापत्रकही सात ते दहा मिनिटांनी मागे पुढे करण्यात आले आहे. डहाणू चर्चगेट आणि विरार डहाणूच्या दिवसभरातील आठ लोकलसेवेच्या वेळेपत्रकात बदल झाले आहेत.
आधीच लोकलच्या फेऱ्या कमी असल्याने प्रवाशांचे हाल होत असतानाच लोकलच्या वेळेत बदल करण्यात आल्यामुळे प्रवाशांना अजून जास्त त्रास सहन करावा लागत आहे. नवीन वेळापत्रकामध्ये पहाटे व रात्री उशिराच्या वेळी अतिरिक्त उपनगरीय लोकल सेवा उपलब्ध व्हावेत तसेच गर्दीच्या वेळी उपनगरीय सेवेमधील अंतर कमी व्हावे ही अपेक्षा पूर्ण न झाल्याने प्रवासी व नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
मेल आणि एक्सप्रेस ट्रेन सेवांचे (लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यात) सुटण्याचे व पोहोचण्याचे वेळापत्रक पश्चिम रेल्वेने 5 ते 10 मिनिटे पुढे मागे करून त्यात बदल केले आहेत. या बदलेल्या वेळापत्रकाचा फटका उपनगरीय लोकल सेवेलाही बसला आहे. पहाटे कामावर जाण्याच्या वेळेवेर असलेल्या लोकलसेवा आणि रात्री परतणाऱ्या लोकलसेवा पाच मिनिटे मागे पुढे केल्या आहेत. डहाणू ते वैतरणा दरम्यान ग्रामीण भागातील नोकरदार वर्ग नागरिक प्रवासी मोठ्याप्रमाणात विरारहून पुढे नोकरीसाठी जातात. मात्र रेल्वेचे वेळापत्रक बदलताना बदलताना नोकरदार वर्ग, चाकरमान्यांचा कुठलाही विचार न करता रेल्वेला व्हव्या त्या पद्धतीने हा बदल केल्याचा आरोप प्रवासी वर्गाकडून आहे. रेल्वेच्या या कृतीबद्दल रेल्वे प्रवाशांकडून व संघटनांकडून याविषयी संताप व्यक्त होत आहे.
डहाणू ते वैतरणा दरम्यानचे हजारो प्रवासी दररोज कामावर जाण्यासाठी लोकल ट्रेनने प्रवास करतात. पहाटे कामाच्या वेळेवर लोकल पकडण्यासाठी ठराविक खाजगी वाहनसेवा आणि एसटीची सुविधा असते. आताच्या वेळापत्रकप्रमाणे एसटी पकडल्यास लोकल निघून जाण्याची शक्यता आहे. खाजगी वाहनसेवा किंवा एसटी सेवेचे वेळापत्रकही बदलावे लागणार आहे. आधीच आपुऱ्या असलेल्या डहाणू लोकल फेऱ्यांमध्ये वेळेतील बदल झाल्याने नोकरदार, विद्यार्थी, शेतकरी व व्यावसायिक प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत.
मेल- एक्सप्रेसला प्राधान्य दिल्यामुळे काही सकाळच्या लोकल 5 ते 10 मिनिटे उशिराने किंवा लवकर धावतात. परिणामी मेल एक्सप्रेसमुळे लोकल बोईसर, पालघर, केळवे रोड या रेल्वे स्थानकात साईडिंगला काढून ठेवण्यात येते. यामुळे सकाळच्या वेळी चर्चगेट व इतर स्थानकात उतरून सरकारी व खाजगी आस्थापनांमध्ये कामाला जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांना वेळेत कामावर पोहोचता येणे कठीण झाले असून कामाच्या ठिकाणी पोहोचण्यास उशीर होत आहे.