विवळवेढे उड्डाणपुलावर पहिल्याच पावसात तळे pudhari photo
पालघर

Vivalvedhe Flyover : विवळवेढे उड्डाणपुलावर पहिल्याच पावसात तळे

पुलावर पाण्याचा निचरा योग्य रितीने होत नसल्यामुळे अपघातांची भीती

पुढारी वृत्तसेवा

कासा : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील विवळवेढे (महालक्ष्मी) उड्डाणपुलावर पहिल्याच पावसात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे निदर्शनास आले आहे. मंगळावर ३० जून रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे पुलाच्या मध्यभागावर पाणी साचल्याने मध्यरात्री या मार्गावरील वाहतूक विस्कळित झाली असून वाहनांची गती मंदावली होती. गेल्या वर्षी याच पुलावर पाणी साचून वाहने संथ झाल्यामुळे एक गंभीर अपघात झाला होता. यंदा पुन्हा पुलावर पाण्याचा निचरा योग्य रीतीने होत नसल्यामुळे अपघाताची भीती निर्माण होत आहे.

महामार्गाच्या काँक्रिटीकरण प्रकल्पांतर्गत विवळवेढे येथील सुमारे ७४० मीटर लांबीच्या उड्डाणपुलावर पूर्वीच्या डांबरी रस्त्यावर काँक्रीटचा थर देण्यात आला होता. मात्र, हे काम करताना योग्य मोजमाप न घेतल्याने पुलावर तीव्र वळणाच्या ठिकाणी खोलगट भाग तयार झाला आहे. त्यातच पावसाच्या पाण्याचा निचरा करणारी मोरी (ड्रेनेज होल्स) काँक्रिटीकरणामुळे अंशतः बुजली गेली आहेत. परिणामी मंगळवारी रात्रीपासून सुरू असलेल्या पावसानंतर पुलावरील पाण्याचा निचरा होण्यास अडथळे निर्माण झाले असून पुलाच्या मध्यभागी पाणी साचून तळ्याचे स्वरूप आले आहे.

गतवर्षी पुलावर काँक्रीटीकरणांनंतर पहिल्याच पावसात याच ठिकाणी पाणी साचले होते. याठिकाणी अपघात झाल्यानंतर प्रशासनाने मोऱ्या मोठ्या करून पाण्याचा निचरा केला होता. यंदा पुलावर पाणी साचल्यानंतर महामार्ग पोलीस आणि स्थानिक प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असून पाण्याचा निचरा करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. मात्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या समस्येवर तात्पुरती मलमपट्टी न करता पुलाच्या रचनेतील तांत्रिक दोष कायमस्वरूपी दूर करून ठोस उपाययोजना करावी अशी मागणी वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

बांधकामातील मोऱ्या बुजल्या

राष्ट्रीय महामार्गावर काँक्रीटीकरण झाल्यानंतर रस्त्यांची उंची वाढली आहे. यामुळे सध्या रस्ता साधारण एक ते दीड फूट उंच झाला आहे. परिणामी उड्डाणपुलावर सुरक्षा रक्षक कठड्यांची उंची कमी झाली असून पूर्वीच्या बांधकामातील मोऱ्या (पॅथ होल्स) बुजले गेले आहेत. गतवर्षी या मोऱ्यांचे पुन्हा खोलीकरण करण्यात आले होते. मात्र या मोऱ्या अरुंद असल्यामुळे यात प्लास्टिक अथवा इतर कचरा अडकल्यास पाण्याचा निचरा होण्यास अडथळे निर्माण होत आहेत. महामार्ग प्राधिकरणाकडून बुधवारी याठिकाणी उपाययोजना करण्यात आल्या असून याठिकाणी पावसाळ्यात पाण्याचा योग्य निचरा करण्यासाठी नियोजन करण्याची गरज व्यक्त होत आहे.

मोऱ्यांमध्ये कचरा अडकल्यामुळे पाण्याचा निचरा होण्यासाठी अडचण निर्माण झाली होती. संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ सूचना देऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. गरज असल्यास मोऱ्यांची रुंदी वाढवण्याची सूचना देण्यात आली आहे.
सुहास चिटणीस, विभागीय व्यवस्थापक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT