बोईसर ः तारापूर एमआयडीसीतील वाढत्या प्रदूषणाविरोधात सामाजिक कार्यकर्ते अमोल गर्जे यांनी पुकारलेले पायी आंदोलन मंगळवारी सकाळी दहा वाजता बोईसर उड्डाणपुल बोईसरहून मंत्रालयाच्या दिशेने मार्गस्थ झाले आहे. हे आंदोलन येत्या तीन दिवसांत मंत्रालयावर पोहोचणार असल्याची माहिती आंदोलनकर्ते अमोल गर्जे यांनी दिली.
यापूर्वी 19 जानेवारी रोजी बोईसरहून मंत्रालयाकडे निघालेले पायी आंदोलन बोईसर पोलिसांनी रोखले होते. मात्र, प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर आणण्यासाठी निर्धार कायम ठेवत आज हे आंदोलन पोलीस अधिकाऱ्यांच्या सुरक्षेत पुढे मार्गक्रमण करीत आहे.
तारापूर औद्योगिक वसाहतीतील प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन सुरू असल्याचे गर्जे यांनी स्पष्ट केले. पायी आंदोलनादरम्यान विविध ठिकाणी स्थानिक नागरिक, सामाजिक संघटना तसेच पर्यावरणप्रेमी संघटनांकडून या आंदोलनाला उत्स्फूर्त पाठबळ मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले.
“प्रदूषणाविरोधातील हा लढा केवळ एका व्यक्तीचा नसून, संपूर्ण परिसरातील जनतेच्या आरोग्यासाठी आहे. जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत हा संघर्ष सुरूच राहील,” असा इशाराही अमोल गर्जे यांनी दिला आहे.दरम्यान, आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून आवश्यक खबरदारी घेण्यात येत असून, परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.