पालकमंत्र्यांच्या वनविभागाला ग्रामीण रस्त्यांचे वावडे  pudhari photo
पालघर

Wada Vikramgad Road Issue : पालकमंत्र्यांच्या वनविभागाला ग्रामीण रस्त्यांचे वावडे

वनविभागाच्या कचाट्यात अडकले रस्ते व जनहिताच्या योजना

पुढारी वृत्तसेवा

वाडा : मच्छिंद्र आगिवले

वाडा व विक्रमगड तालुक्यातील बहुतांश भाग ग्रामीण व दुर्गम असून स्वातंत्र्यपूर्व काळापासून या भागाचा फारसा विकास झालेला बघायला मिळत नाही. ग्रामीण भागाला शहराशी जोडणारे अनेक रस्ते वनविभागाच्या कचाट्यात अडकले असून यामुळे ग्रामीण भाग अधिकच दुर्गम बनत चालला आहे.

उन्हाळ्यातील प्रमुख समस्या असणारी पाणीटंचाई याच वन विभागाच्या आडमुठेपणाचा शिकार बनली असून मुख्य महामार्ग देखील वनविभागाच्या कचाट्यात सापडलेला आहे. पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याचे वनमंत्री असूनही त्यांच्या जिल्ह्यातील जनतेची होणारी ही फरपट त्यांना का दिसत नाही असा सवाल विचारला जात आहे.

वाडा तालुक्यातील खोडदे, मूहमाळ, ताडमाळ, सातरोंडे, पाचघर, निहाली, म्हसेपाडा यांसारख्या असंख्य गावात आजही पक्का रस्ता पोहोचलेला नाही. रस्ते नसल्याने साहजिकच आरोग्य, शिक्षण, रोजगार व दळणवळणाची मोठी समस्या उद्भवत असून अजून किती वर्षे ही आपसोय सहन करायची असा जनतेचा सवाल आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेसह अन्य विभागातून मंजूर झालेल्या अनेक रस्त्यांना वन विभागाने लाल झेंडा दाखवून रोख लावली आहे.

मूहमाळ, ताडमाळ व पाचघर गावांत पक्का रस्ता नसल्याने गावात जाण्यासाठी लोकांना मोठा संघर्ष करावा लागतो. निव्वळ पायी चालणे जिकिरीचे बनत असून वाहन चालविणे म्हणजे दिव्य पार करण्यासारखे आहे. गरोदर माता, लहान बालक व रुग्णांना मोठी कसरत करावी लागत असून ऊन व पावसाळ्यात जनतेवर संकट कोसळते. तालुक्यातील जलजीवन मिशनच्या बहुतांश योजना वन विभागाच्या कचाट्यात सापडल्या असून प्रशासकीय समन्वयाचा अभाव जनतेला चटके देत आहेत असा लोकांचा आरोप आहे.

मनोर - वाडा - भिवंडी महामार्गाचे काँक्रीटीकरण सुरू असून 55 किमी अंतरापैकी 10 किमी वन विभागाच्या हद्दीत रस्त्याची अवस्था बिकट असून वन विभाग या पट्ट्यात कामात अडथळा निर्माण करीत असल्याचे अधिकारी सांगतात. राज्याचे वनमंत्री पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री असून सातत्याने जनता दरबार घेऊन लोकांचा समस्या निवारण्याचे काम करीत आहेत. जिल्ह्यातील रस्ते व महत्वाच्या योजना वन विभागाच्या कचाट्यात सापडले असताना पालकमंत्री करतात काय असा सवाल विचारला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT