वाडा : स्वच्छ भारत मिशन या शीर्षाच्या माध्यमातून ग्रामपंचायतीना कचरा विलगीकरण केंद्राचे शेड उभारण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. वाडा तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींनी तातडीने असे शेड उभारले मात्र यातील अनेक केंद्रांत कचरा बघायला मिळत नसल्याने शेड आहेत कशासाठी असा प्रश्न लोकांना पडला आहे. लोकांना कचरा टाकण्यासाठी प्रोत्साहित करण्यात अनेक ग्रामपंचायती बहुधा अयशस्वी ठरत असून यासाठी केला जाणारा खर्च मात्र ग्रामपंचातींच्या अंगावर पडत असल्याचे ग्रामस्थ सांगतात.
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत वाडा तालुक्यातील 85 ग्रामपंचायतीना कचरा विलगीकरण केंद्र उभारण्यासाठी शेड उभारण्याच्या सूचना करण्यात आल्या. यातील 67 ठिकाणी शेड पूर्ण झाले असून अनेकांनी तर पावसाळ्यातच हे शेड उभारले आहेत. दोन लाखांचा खर्च प्रत्येक शेडसाठी मंजूर असून ग्रामपंचायतीच्या 15 वित्त आयोगाचा निधी यासाठी वळविण्यात आला आहे. 12 फूट रुंद व 15 फूट लांब या शेडमध्ये अनेक रंगीत विभाग असून यात ओला व सुका कचरा, प्लास्टिक, काचा, चप्पलबुट असे कचऱ्याचे विलगीकरण करण्यात येणे अपेक्षित आहे.
प्रत्यक्षात अनेक विलगीकरण केंद्र बघता यात कोणताही कचरा लोकांनी टाकलेला पहायला मिळत नाही. ग्रामीण भागात लोकांना कचरा फेकण्यासाठी पुरेसी खाजगी जागा उपलब्ध असते शिवाय कचरा विलगीकरणाचे फारसे महत्त्व लोकांना वाटत नसल्याने हे शेड शोभेची बाहुली बनलेली आहे. शासकीय योजना केवळ राबविण्यासाठी येत असून त्याचा लोकांना प्रत्यक्ष किती उपयोग होतो याचे कुणालाही देणंघेणं नसल्याचे
काही सामाजिक कार्यकर्ते सांगतात. प्रत्येक ग्रामसेवक व सरपंचांना नव्याने कचरा विलगीकरणाचे महत्त्व पटवून देणे गरजेचे असून लोकांचा यात सहभाग लाभला तरचं अनाठायी होणारा खर्च सार्थकी लागेल असे लोकांचे म्हणणे आहे. याबाबत पाणी पुरवठा व स्वच्छ्ता विभाग वाडाचे शाखा अभियंता संकेत पगारे यांना संपर्क केला असता ग्रामसेवकांना बैठकीत नव्याने सूचना दिल्या जातील असे त्यांनी सांगितले.