Wada Tyre Pyrolysis Pudhari
पालघर

Wada Tyre Pyrolysis: वाडा तालुक्यात टायर पायरोलिसिस कारखान्यांचा उच्छाद; पर्यावरण धोक्यात

७७ कारखान्यांमुळे हवा-माती प्रदूषित; कारवाई न झाल्यास ‘कुडूस ते मंत्रालय’ पायी मोर्चाचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

वाडा : मच्छिंद्र आगिवले

वाडा तालुक्यातील औद्योगिक क्षेत्र विकसित झाल्याने स्थानिकांना रोजगार व विकासाला चालना मिळेल अशी अपेक्षा होती. चांगल्या उद्योजकांनी घेतलेला काढतापाय व घातक कारखान्याची वाढती घुसखोरी यामुळे मात्र तालुक्यातील पर्यावरणाचा अक्षरशः गळा घोटला जात असून सध्या वाड्यात भयानक परिस्थिती उभी राहिली आहे. जुन्या टायरवर प्रक्रिया करणाऱ्या पायरोलिसिस कंपन्यांनी वाडा तालुक्याला खिंडीत गाठले असून भविष्यात याचे भयानक परिणाम लोकांना सोसायला लागतील अशी चिंता व्यक्त केली जात आहे. वाडा तालुका पर्यावरण संवर्धन शिष्टमंडळाने याविरोधात दंड थोपटले असून पालघर जिल्हाधिकारी व वाडा प्रांताधिकारी यांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली जात आहे.

वाडा तालुक्यात मुसारने, उसर, वडवली, बिलोशी, कोनसई, कोने, सापने, पाली अशा अनेक गावांमध्ये जवळपास 77 टायर पायरोलिसिस प्रक्रिया करणारे कारखाने आहेत. खरेतर यातील बहुतांश कारखाने अवैध पद्धतीने चालविले जात असल्याचा आरोप असून सर्वच कारखाने नियमांना तिलांजली देऊन तालुक्यातील पर्यावरणाची राखरांगोळी करीत असल्याचे ग्रामस्थ सांगतात. पालघर जिल्हाधिकारी व वाडा प्रांताधिकारी यांना नुकतेच पर्यावरण संवर्धन शिष्टमंडळाने निवेदन सादर केले असून तातडीने या कारखान्यांचा बंदोबस्त करा अन्यथा कुडूस ते मंत्रालय पायी मोर्चा काढू असा इशारा देण्यात आला आहे. वन विभागाकडून विशेषतः अभयारण्य व वनक्षेत्र नजिक असल्यास नाहरकत दाखला आवश्यक असून अग्निशमन विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र आवश्यक आहे. औद्योगिक आरोग्य व सुरक्षा संचालनालयाची वैध मान्यता आवश्यक असून ज्वलनशील पदार्थ साठवणुकीची मान्यता लागते. ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेचा वैधानिक मार्गाने मिळविलेला ठराव आवश्यक असून तालुक्यातील बहुतांश कारखान्यांकडे कोणतेही वैध दाखले नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.

प्रदूषण नियंत्रण मंडळाने आखून दिलेल्या कार्यपद्धतीनुसार कारखान्यांनी आपली कार्यपद्धती हाकायला हवी मात्र कोणतेही नियम पाळले जात नसल्याचे ग्रामस्थ सांगतात. कार्बन कण व घातक वायू हवेत सोडला जात असून पायरोलिसिस ऑईल साठवून निष्काळजीपणे केली जाते असा आरोप आहे. दुर्गंधीयुक्त काळा व अतिशय घातक वायू थेट हवेत सोडला जात असून यामुळे प्रचंड प्रदूषण होत शिवाय लोकवस्ती, शाळा व शेती उत्पादनांच्या जवळ हे उद्योग असल्याने सार्वजनिक आरोग्य संकटात सापडले आहे. उसर ग्रामपंचायत हद्दीत असणाऱ्या श्री दत्ता इंटरप्राईजेस या कंपनीत नुकताच स्फोट होऊन चार कामगार गंभीर जखमी झाले होते.

ऑगस्ट 2025 मध्ये कंपनीला बंदीचे आदेश देण्यात आले होते मात्र औद्योगिक आरोग्य व सुरक्षा विभागाची वैध परवानगी नसतानाही जानेवारी 2026 मध्ये कंपनी पुन्हा सुरू करण्यात आली. याचाच परिणाम म्हणून अवघ्या 20 दिवसांत कंपनीत गंभीर अपघात झाला ज्यात कामगार जखमी झाले. प्रत्यक्ष पाहणी न करता कार्यालयात बसून परवानगी दिल्या प्रकरणी औद्योगिक आरोग्य व सुरक्षा विभागासह प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करावी अशी मागणी केली जात आहे.

वाडा तालुक्यात टायर पायरॉलिसिस कंपन्यांनी जो उच्छाद मांडला आहे त्याने आता हद्द पार केली असून उद्योग - व्यवसायांच्या नावाने फोफावत चालणारी ही विषारी वेल आता उखडून फेकण्याची वेळ आली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळांसह सर्व प्रशासकीय यंत्रणा झोपेचे सोंग घेत असले तरी जनता जागृत आहे आणि यासाठीच आम्ही हा लढा उभारला आहे. आमच्या मागण्या तातडीने पूर्ण झाल्या नाहीत तर कुडूस नाका ते मुंबई मंत्रालय असे चालत जाऊन न्याय मागू.
कल्पेश पाटील, सामाजिक कार्यकर्ते व स्थानिक रहिवाशी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT