वाडा : मच्छिंद्र आगिवले
वाडा नगरपंचायत क्षेत्रात 17 प्रभाग असून मुख्य शहरासह मोहंड्याचापाडा, सोनारपाडा, तळ्याचापाडा, नेहरूनगर, खंडेश्वरीनाका परिसर, कवठेपाडा, अंबिस्तेपाडा अशा विविध भागात नगरपंचायत क्षेत्र विभागले आहे. 12 हजार मतदारांपैकी सर्वात अधिक लोकसंख्या आदिवासी मतदारांची असूनही प्रभागात आदिवासी जनता सुविधांपासून उपेक्षित आहेत. आठ वर्षात मूलभूत समस्या देखील सोडविण्यात प्रशासन यशस्वी ठरलेले नसून मतदान करायचे तरी कशासाठी असा प्रश्न अनेक मतदारांना पडतो. वाढलेले कर, सोईसुविधांची अबाल, योजनांनी फिरवलेली पाठ यामुळे उलट ग्रामपंचायत बरी होती असे लोकांचे मत आहे.
वाडा ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर होऊन 2017 साली पहिल्या निवडणुका घेण्यात आल्या ज्यात सेनेकडे नगराध्यक्ष पदासह 6 नगरसेवक, भाजपा 6 , काँग्रेस 2, राष्ट्रवादी 1, बविआ 1 व आरपीआय 1 असे पक्षीय बलाबल होते. सत्तेचा सारीपाट मांडून जनतेच्या प्रश्नांकडे मात्र सपशेल दुर्लक्ष झाल्याने मागील आठ वर्षात जनतेच्या नशिबात केवळ काँक्रीटचे जंगल उभारण्यात सत्ताधाऱ्यांना यश आले आहे. काँक्रिट रस्ते व संरक्षक भिंती या खेरीज कोणतेही विकासकाम बघायला मिळत नसून निकृष्ट दर्जाच्या या कामांना विकास म्हणायचा का असा सवाल विचारला जात आहे.
नगरपंचायत क्षेत्रात 3 हजारांहून अधिक मतदान आदिवासी समाजाचे असून मोठ्या संख्येने येथे आदिवासी कुटुंब वास्तव्य करतात. पिण्याच्या पाण्यासाठी येथील जनतेला आजही संघर्ष करावा लागत असून सोनारपाडा व कवठेपाड्यात तर टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ येते. सोनारपाड्यात लोकांना घोटभर पाण्याची जीवाच्या आकांताने वाट बघावी लागत असून डंपिंग ग्राउंडच्या घाण वासाने जनता त्रस्त आहे.
पाण्याच्या वाहिन्या केवळ दिखावा आहे प्रत्यक्ष पाणी येण्यास अजून 5 वर्षे लागतील हे जनतेला समजून चुकले आहे. घरकुल योजनांचा अभाव, रोजगारासाठी योजनांची वानवा, आरोग्य व पोषण आहाराची बोंब, कागदपत्रे व योजनांसाठी करावी लागणारी धडपड , विजेची वाढलेली बिल अशा अनेक समस्यांनी जनता बेजार आहे. ग्रामपंचायत काळात किमान घरकुल योजना व रोजगाराची खात्री होती, नगरपंचायत स्थापनेनंतर मात्र उलट खिशाला कात्री लागल्याचे नागरिक संतापाने सांगतात.