Wada industrial pollution Pudhari
पालघर

Wada industrial pollution: गुदमरलेल्या वाडावासीयांना हवाय मोकळा श्वास; आधी टायर कंपन्या, आता फटाका कारखाना, भविष्यात क्रशर प्लांट?

हे कमी की काय तर काही दिवसांपूर्वीच एका फटाक्याच्या कारखान्याला लागलेल्या आगीत दोन जणांचा मृत्यू झाला आणि काही जखमी देखील झाले.

पुढारी वृत्तसेवा

हनिफ शेख

पालघर : काही महिन्यांपूर्वीच वाडा तालुक्यातील टायर कंपन्यांमधून निघणाऱ्या दूषित वायूमुळे आसपासच्या गावांना धोका निर्माण झाला होता. याबाबत थेट जिल्हाधिकारी कार्यालयातून कारवाई झाल्यानंतर अनेक टायर कंपन्या बंद झाल्या होत्या. मात्र त्या पुन्हा काही अंशी सुरू असल्याचे दिसून आले. हे कमी की काय तर काही दिवसांपूर्वीच एका फटाक्याच्या कारखान्याला लागलेल्या आगीत दोन जणांचा मृत्यू झाला आणि काही जखमी देखील झाले.

यावेळी अतिशय गंभीर बाब समोर आली. ती म्हणजे या फटाका निर्माण करणाऱ्या कारखान्याकडे कसलीच परवानगी नसल्याचे दिसून आले. मुळात फटाक्याचे कारखाने असतील की टायर कंपन्या या प्रचंड मोठ्या प्रमाणावर दूषित वायू निर्माण करत असल्याचे चित्र आहे.

मात्र याहीपेक्षा भयंकर प्रकार आता वाडा आणि विक्रमगड तालुक्यात सुरू असून या ठिकाणी दगड खाणींचे प्रमाण देखील वाढले आहे तर याच बरोबर क्रशर प्लांट मुळे प्रचंड मोठ्या प्रमाणावर धुळीचे कण वाडा तालुक्याच्या आसपास पसरत आहेत याशिवाय या क्रशर प्लांट वरून होणारी वाहतूक यामुळे अल्पावधीतच खराब होणारे रस्ते गावागावातून जाणाऱ्या या मोठ्या जड वाहतुकीमुळे मोठ्या प्रमाणावर धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.

यामुळे ज्या पद्धतीने फटाका कारखान्याला कोणतीही परवानगी नसताना तो चालू होता. याप्रमाणे या भागात देखील अनेक दगड खाणी आणि क्रशर प्लांट हे अनधिकृत रित्या चालू असण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे याबाबतीत जिल्हाधिकारी कार्यालयातूनच ही गंभीर बाब लक्षात घेऊन वरिष्ठ पातळीवरून कारवाई होणे आवश्यक बनले आहे.

कारण की यासंबंधी कारवाई करणारी स्थानिक यंत्रणा आणि क्रशर प्लांट किंवा दगडखांचे मालक यांच्यामध्ये अर्थपूर्ण संबंध असण्याची दाट शक्यता असल्याने कारवाई होत नाही मात्र या सगळ्या प्रकारामुळे वाडा वाशीयांचा श्वास कोंडतोय ही बाब अधोरेखित करण्यासारखी नक्कीच आहे.

निसर्गसंपन्न वनराईने नटलेला पालघर जिल्ह्यातील वाडा तालुका सध्या औद्योगिक भस्मासुराच्या विळख्यात सापडला असून, येथील दगड खाण आणि क्रशर प्लांटच्या अनिर्बंध कारभारामुळे जनजीवन पूर्णतः उद्ध्वस्त झाले आहे.

पर्यावरणाचे रक्षण ज्यांच्या खांद्यावर आहे, तेच शासकीय अधिकारी आणि संबंधित विभाग नेमके करतय काय हा सवाल असून ज्या प्रमाणे एवढा मोठा फटाका कारखाना चालू असल्याचे संबंधित प्रशासनाला माहितीच नसेल तर तोच प्रकार या अनधिकृत दगडखानी आणि क्रशर प्लांट बाबत देखील असू शकतो का? या शंकेला नक्कीच वाव आहे यामुळे ज्यांच्यावर या प्रदूषणकारी उद्योगांवर कारवाई करायची आहे तेच अशा उद्योगांना पाठीशी घालत असल्याचे भयावह वास्तव समोर येत आहे.

मुळात सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या आणि वैतरणा-पिंजाळ नद्यांच्या सानिध्यात असलेल्या या तालुक्यातील भूभागावर 45 टक्क्यांहून अधिक वनक्षेत्र आहे. मात्र, पश्चिम घाटातील हा इको-सेन्सेटिव्ह झोन आता अनधिकृत दगड क्रशर, रेडी मिक्स काँक्रिट आणि एएसी ब्लॉक उद्योगांच्या विळख्यात सापडला आहे. हरित पट्ट्याऐवजी आता येथे सिमेंटची धूळ आणि राखेचे डोंगर दिसत आहेत.

खरंतर या उद्योगांचा सर्वाधिक फटका स्थानिक आदिवासी आणि शेतकऱ्यांना बसला आहे. भातशेती आणि आंबा-काजूच्या बागांवर धुळीचा जाड थर साचल्याने उत्पादनात 50 टक्क्यांहून अधिक घट झाली आहे.

गावोगावी श्वसनाचे विकार, दमा आणि त्वचारोगांचे प्रमाण प्रचंड वाढले असून, लहान मुले आणि वृद्धांचे आरोग्य धोक्यात आले आहे. स्थानिक तहसीलदार, जिल्हाधिकारी कार्यालय आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी या तक्रारींकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे. ओव्हरलोड डंपरमुळे रस्त्यांची चाळण झाली असून, अपघातांचे सत्र सुरूच आहे. अधिकाऱ्यांचे हे मौन आणि अनधिकृत उद्योगांना मिळणारे छुपे समर्थन, वाड्याच्या नैसर्गिक वैभवाचा मुडदा पाडण्यास कारणीभूत ठरत आहे.

नियम धाब्यावर, स्थानिक अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष?

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महसूल विभागाच्या नियमांनुसार, क्रशर युनिट्सना उंच भिंतींचे आच्छादन, पाणी फवारणी यंत्रणा आणि हरित पट्टा अनिवार्य आहे. परंतु, प्रत्यक्षात एकाही नियमाची अंमलबजावणी होताना दिसत नाही.

आरएमसी प्लांटमधून निघणारे घातक सांडपाणी थेट नदीपात्रात सोडले जात असून, त्यामुळे जलस्रोत विषारी बनले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, हे उद्योग विनापरवाना आणि पर्यावरणाची कोणतीही परवानगी न घेता राजरोसपणे सुरू आहेत. यामुळे स्थानिक प्रशासनाच्या भरवशावर न राहता जिल्हाधिकारी यांनीच आता या प्रकरणात लक्ष देणे आवश्यक असून येथील अनधिकृत दगड खाणी आणि क्रशर प्लांट यांची वरिष्ठ स्तरावरून चौकशी होणे गरजेचे बनले आहे. अन्यथा जिल्ह्यातील अनेक निसर्ग संपन्न भागात धुळीचे साम्राज्य निर्माण होऊ पाहत आहे.

वेळ पडल्यास मोठ्या जनआंदोलन

जर वेळीच लगाम घातला नाही, तर हा परिसर भविष्यात राहण्यायोग्य उरणार नाही, असा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे. वाड्याचा विकास करण्याच्या नावाखाली येथील निसर्गाचा आणि मानवी आरोग्याचा बळी दिला जात आहे. जर प्रशासनाने या अवैध उद्योगांना आवर घातला नाही आणि प्रदूषण करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली नाही, तर भविष्यात वाडा तालुका केवळ एक औद्योगिक कचराकुंडी म्हणून ओळखला जाईल. स्थानिक जनतेचा संताप आता अनावर होत असून, वेळ पडल्यास मोठ्या जनआंदोलनाची चिन्हे दिसत आहेत.

दगड खाणी चा निश्चित आकडा नाही कारण की विशिष्ट कालावधीत त्याच्या परवानग्या घेतल्या जातात त्यामुळे आकड्यात बदल होतात तर क्रशर प्लांट 55 पेक्षा अधिक आहेत.अनधिकृत दगड खाणी बाबत तक्रार आल्यास आम्ही तात्काळ तपास करुन कारवाई करीत असतो.
-भाऊसाहेब अंधारे, तहसीलदार, वाडा .

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT