वाडा: ‘वीरू बसंतीसाठी पाण्याच्या टाकीवर चढला...’ हा हिंदी चित्रपटातील गाजलेला प्रसंग. मात्र वाडा तालुक्यातील उचाट गावाजवळ मंगळवारी याच प्रसंगाची जणू ‘उलटी पटकथा’ पाहायला मिळाली.
येथे एका तरुणीने आपल्या प्रियकरासाठी थेट उंच विद्युत मनोऱ्यावर चढून दोन तास प्रशासनाची धावपळ उडवली. ‘माझ्या प्रियकराने माझ्याशीच लग्न करून माझ्यासोबत संसार करावा,’ या मागणीसाठी तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती पोलिसांनी दिली.
उचाट गावाजवळील विद्युत मनोऱ्यावर तरुणी चढल्याची माहिती मिळताच पोलिस आणि प्रशासनाची धावपळ सुरू झाली. विशेष म्हणजे मनोऱ्यातून त्या वेळी वीजप्रवाह सुरू असल्याची माहिती मिळाल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनली. पोलिसांनी तातडीने वीजप्रवाह बंद करण्याची कार्यवाही केली.
त्यानंतर तरुणीला खाली उतरविण्यासाठी पोलिसांनी तिच्याशी संवाद साधत परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न सुरू केला. चित्रपटात वीरू बसंतीसाठी पाण्याच्या टाकीवर चढला होता; येथे मात्र ‘बसंती’च आपल्या ‘वीरू’साठी मनोऱ्यावर चढल्याने उचाट परिसरात ‘शोले’ची आठवण झाली.
एका विवाहित तरुणावर आपले प्रेम असून त्याने माझ्यासोबत लग्न करून फक्त माझ्याच सोबत संसार थाटून रहावे, अशी तिची मागणी होती. त्यामुळे मनोऱ्यावर चढलेल्या तरुणीला खाली उतरविण्यासाठी पोलिसांना मोठी शिताफी दाखवावी लागली.
सुमारे दोन तास चाललेल्या या नाट्यमय प्रसंगामुळे परिसरात नागरिकांची गर्दी झाली होती. पोलिसांनी संयमाने परिस्थिती हाताळत तरुणीशी संवाद साधला आणि अखेर सकारात्मक तोडगा काढण्यात यश मिळविले. त्यानंतर तिला मनोऱ्यावरून सुरक्षितपणे खाली उतरविण्यात आले. सध्या तरुणीवर उपचार सुरू असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करीत आहेत.