वाडा : वाडा तालुक्यातील दिनकरपाडा गावातील जिनियस पेंट या कंपनीला बुधवारी १२ च्या सुमारास भीषण आग लागली. गावाला खेटून ही कंपनी असल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून अग्निशमन यंत्रणा येईपर्यंत बहुतांश कंपनी जळून खाक झाली. सुदैवाने यात जीवितहानी झाली नसून धुराचे लोट मात्र अंगावर शहारा आणणारे होते.
दिनकरपाडा गावालगत जिनियस पेंट कंपनीमध्ये कच्च्या मालावर प्रक्रिया करून रंगाचे उत्पादन केले जाते. अर्थात कंपनीत रंग तयार करण्यासाठी लागणारी सामग्री ज्वलनशील असून अज्ञात कारणाने या कंपनीला दुपारी भीषण आग लागल्याने आगीने क्षणात रौद्ररूप धारण केल्याचे स्थानिक सांगतात. आगीचे लोळ बघता स्थानिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले असून दिनकरपाडा या लहानशा गावात असणारे असंख्य कारखाने चिंतेत सापडले होते.
रंग व कच्च्या मालाच्या टाक्यांना आग लागून मोठ्या प्रमाणात स्फोट व धुराचे लोट बाहेर पडत असल्याने परिसरातील चिंतेचे वातावरण पसरले होते. वाडा व भिवंडी येथील अग्निशमन दलाला गाड्यांना पाचारण करण्यात आल्याचे सांगण्यात आले असून गाड्या घटनास्थळी पोहचेपर्यंत कंपनी मात्र पूर्णपणे जळून खाक झाली. आगीचे कारण अस्पष्ट असून वाडा पोलीस या प्रकरणी चौकशी करत आहेत.