Fish Price Hike Pudhari
पालघर

Wada Chicken Fish Price: वाड्यात चिकन-मच्छी दर गगनाला; ग्राहक हैराण, शाकाहाराकडे कल

चिकन 280 रुपये किलो, मच्छीचेही दर वाढले; विक्रेत्यांच्या मनमानीवर संताप

पुढारी वृत्तसेवा

वाडा : चिकन हा आजच्या काळात मांसाहारी खवय्यांसह सर्वसामान्य कुटुंबातील प्रत्येकाच्या ताटातील मेनू असून काहीसे स्वस्त व चवीला टेस्टी असल्याने अनेकांची पसंती चिकनला असते. वाडा शहरात मात्र विक्रेत्यांच्या मनमानी कारभाराने हेच चिकन आवाक्याच्या बाहेर गेले आहे. चिकन सोबत मच्छीचे दर गगनाला भिडले असून शाकाहाराकडे मोर्चा वळविण्याची वेळ जनतेवर आली आहे.

व्यायाम करणाऱ्यांचा डाएट असो की सामान्यांच्या घरात मांसाहारीचा बेत असो, ताटात चिकन असणारच इतकी लोकप्रियता या पदार्थाला आहे. वाडा शहरात चिकनचे दर तब्बल 280 रुपये प्रतिकिलो झाले असून काहिकेल्या हे दर कमी व्हायचे नाव घेत नाहीत. शहराच्या बाजूला 200 ते 220 रुपये प्रति किलो दराने चिकन भेटत असून वाडा शहरातील मांसाहारी व्यापारी संघाच्या मनमानीमुळे ग्राहकांना हा भुर्दंड सहन करावा लागत आहे असे बोलले जाते. अनेक ठिकाणी अतिशय घाणेरड्या पद्धतीने चिकन बनवून विकले जात असून जागोजागी उघड्यावर याची दुकाने बघायला मिळत आहेत. काही विक्रेते कमी दराने चिकन विकण्यास इच्छुक आहेत मात्र काही लीडर तसे करू देत नाही असे खाजगीत सांगतात.

शहरात एकीकडे चिकनचे दर गगनाला भिडले असून मटण तर सामन्यांच्या आवाक्या बाहेर गेले आहे. अशा अवस्थेत मच्छी दिलासा देते मात्र मच्छीचा भाव चांगलाच कडाडला असून मांसाहारी खवय्यांनी खायचे तरी काय असा प्रश्न त्यांना पडला आहे. ओले बोंबील ज्यांना कुणी फार विचारत नाही त्यांचे भाव 800 रुपये किलोवर पोहोचले असून पापलेट, सुरमई, दाढा व वाम यांकडे सर्वसामान्यांनी महागाईमुळे पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे.

खरेतर मच्छी व चिकनचे दर विक्रेत्यांच्या मनानुसार बदलत असून सामान्य ग्राहकांना याचा फटका सहन करावा लागत आहे. ग्राहक हक्क दिनाच्या निमित्ताने वाडा शहरातील ग्राहकांनी मात्र या प्रकाराचा कडाडून निषेध व्यक्त केला असून यावर नियंत्रण येणार कधी असा सवाल विचारला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT