विजयवल्लभ रुग्णालयातील जळीतकांडाला 5 वर्षे पूर्ण  pudhari photo
पालघर

Vijay Vallabh hospital fire case : विजयवल्लभ रुग्णालयातील जळीतकांडाला 5 वर्षे पूर्ण

न्याय अद्याप अधांतरी

पुढारी वृत्तसेवा

विरार ः विरारमधील पश्चिम येथील विजयवल्लभ रुग्णालयात घडलेल्या भीषण जळीतकांडाला 23 एप्रिल रोजी तब्बल 5 वर्षे पूर्ण झाली आहेत. 2021 मध्ये घडलेल्या या घटनेने संपूर्ण राज्य हादरून गेले होते. अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीमुळे 17 रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला होता.कोरोनाच्या काळात घडलेल्या या दुर्घटनेने आरोग्य व्यवस्थेतील गंभीर त्रुटी उघड केल्या होत्या. मात्र एवढ्या मोठ्या दुर्घटनेनंतरही दोषींवर ठोस कारवाई न झाल्याने मृतांच्या नातेवाईकांमध्ये आणि नागरिकांमध्ये तीव्र संताप कायम आहे.

23 एप्रिल 2021 रोजी पहाटेच्या सुमारास रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात आग लागल्याचे समोर आले होते. या विभागात उपचार घेत असलेल्या गंभीर रुग्णांना बाहेर काढण्यास वेळ मिळाला नाही आणि काही मिनिटांतच धूर व ज्वाळांनी संपूर्ण विभाग वेढला. अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली असली तरी आगीची तीव्रता मोठी असल्यामुळे 17 रुग्णांचा जीव वाचवता आला नाही. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात शोककळा पसरली होती.

या दुर्घटनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय चौकशी समिती नेमण्यात आली होती. या समितीने सादर केलेल्या अहवालात रुग्णालय प्रशासनासह वसई-विरार महानगरपालिकेतील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गंभीर ठपका ठेवण्यात आला होता. विशेषतः अतिरिक्त आयुक्त (अभियंत्रण व आपत्ती व्यवस्थापन), अतिरिक्त आयुक्त (वैद्यकीय आरोग्य व विद्युत), तसेच आरोग्य, विद्युत आणि अभियंत्रण विभागातील उपआयुक्त आणि संबंधित अधिकारी यांना या दुर्घटनेस जबाबदार ठरविण्यात आले होते. तरीदेखील, या अहवालानंतर अपेक्षित ती कठोर कारवाई झालेली नाही.

चौकशीत रुग्णालयातील अग्निसुरक्षा यंत्रणा अपुरी असल्याचे, अग्निशमन यंत्रणा कार्यरत नसल्याचे, तसेच विद्युत व्यवस्थेत त्रुटी असल्याचे स्पष्ट झाले होते. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी आवश्यक असलेली तयारी आणि प्रशिक्षण देखील अपुरे असल्याचे निदर्शनास आले. यामुळेच आगीची तीव्रता वाढून मोठी जीवितहानी झाली, असा निष्कर्ष नोंदवण्यात आला होता. या घटनेनंतर राज्यभरातील रुग्णालयांमध्ये अग्निसुरक्षेच्या तपासण्या करण्याचे आदेश देण्यात आले होते.

मात्र, पाच वर्षांचा कालावधी उलटूनही या प्रकरणात न्याय मिळालेला नाही, ही बाब चिंताजनक आहे. मृतांच्या कुटुंबीयांनी वारंवार न्यायाची मागणी केली असून दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी सातत्याने होत आहे. एवढ्या मोठ्या दुर्घटनेनंतरही जबाबदार अधिकाऱ्यांवर ठोस कारवाई न झाल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

दोषींना शिक्षेची अपेक्षा

दरम्यान, या घटनेने केवळ विरारच नव्हे तर संपूर्ण राज्यातील आरोग्य व्यवस्थेला धक्का दिला होता. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी रुग्णालयांमध्ये अत्याधुनिक अग्निसुरक्षा यंत्रणा, नियमित तपासणी आणि प्रशिक्षित कर्मचारी असणे अत्यावश्यक असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. आता तरी प्रशासनाने या प्रकरणात वेगाने निर्णय घेऊन दोषींना शिक्षा करावी आणि मृतांना न्याय मिळवून द्यावा, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT