Virar Crime News Pudhari
पालघर

Virar Crime News: विरारमध्ये माहिती अधिकार कार्यकर्त्याची दगडाने ठेचून हत्या

शिरगाव खदान परिसरातील घटना; मंडल अधिकारी जखमी

पुढारी वृत्तसेवा

नालासोपारा: विरार पूर्वेतील शिरगाव खदान परिसरात भरदिवसा घडलेल्या एका भीषण हत्याकांडाने संपूर्ण वसई-विरार परिसर हादरला आहे. माहिती अधिकारासाठी सातत्याने लढा देणारे कार्यकर्ते आत्माराम पाटील यांची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली.

या हल्ल्यात मंडळ अधिकारी प्रभाकर पाटील हे ही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दिवसाढवळ्या एका कार्यकर्त्याचा जीव जातो, सरकारी अधिकारी जखमी होतो आणि खदान परिसरात कायद्याची उघडपणे पायमल्ली होते, यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी 12 ते 1 वाजण्याच्या सुमारास आत्माराम पाटील हे मंडळ अधिकारी प्रभाकर पाटील यांच्यासह शिरगाव खदान परिसरात गेले होते. यावेळी एका खदान मालकाशी वाद झाल्यानंतर आरोपीने संतापाच्या भरात आत्माराम पाटील यांच्या व्हॅगनार कारची तोडफोड केली. त्यानंतर दगडाने त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. या क्रूर हल्ल्यात आत्माराम पाटील यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच विरार पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून तपास सुरू केला असून आरोपीचा शोध घेतला जात आहे. विरार पोलिसांनी मात्र या संदर्भात काही बोलण्यास नकार दिला आहे. आमचा तपास सुरू आहे, लवकरच आम्ही तुम्हाला माहिती देऊ असे त्यांनी सांगितले आहे.या हत्याकांडामुळे विरारमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

थरारक घटनेने कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित असतानाच हा थरार घडल्याने प्रशासनाच्या सुरक्षाव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. अवैध खदानी, स्थानिक तक्रारी आणि माहिती अधिकारातून उघड होणारे प्रकार यावर कारवाई करण्याऐवजी तक्रारदारांनाच जीव गमवावा लागत असेल, तर सामान्य नागरिकांनी न्याय कुणाकडे मागायचा? असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT