विरार ः चेतन इंगळे
विरार पूर्वेतील मनवेलपाडा परिसर सध्या अवैध लक्झरी बस पार्किंगमुळे अक्षरशः ‘बस अड्डा’ बनला असून नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. ठाणे, नवी मुंबई, नाशिक, विदर्भ आदी भागांतून येणाऱ्या मोठ्या लक्झरी बसेस या प्रमुख रस्त्यावरच उभ्या केल्या जात असल्याने संपूर्ण मार्गावर वाहतूक कोंडीचे चित्र निर्माण झाले आहे. विरार पूर्व ते नालासोपारा व वसईला जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग असताना प्रशासनाचे दुर्लक्ष नागरिकांच्या संतापाला कारणीभूत ठरत आहे.
विशेष म्हणजे, या अवैध पार्किंगविरोधात प्रादेशिक परिवहन विभागाकडून वेळोवेळी कारवाई करण्यात येते. मात्र ही कारवाई फक्त दोन ते तीन दिवस टिकते आणि त्यानंतर पुन्हा बसेस पूर्वीप्रमाणेच रस्त्यावर उभ्या राहतात. त्यामुळे “ही कारवाई केवळ दिखाव्यापुरतीच आहे का?” असा सवाल स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत. काही समाजसेवक व स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याकडून आर्थिक व्यवहार होत असल्याच्या चर्चाही जोर धरत असून, या संपूर्ण प्रकारामागे मोठे जाळे कार्यरत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
या परिसरातील परिस्थिती अधिक गंभीर करणारी बाब म्हणजे, रस्त्याच्या कडेलाच बस दुरुस्तीची कामे सुरू असतात. इंजिन दुरुस्ती, टायर बदल, धुणे आदी कामांमुळे रस्त्यावर तेल, कचरा आणि घाण साचत असून नागरिकांच्या आरोग्यावरही त्याचा परिणाम होत आहे. इतकेच नव्हे, तर याच ठिकाणी आधी दोन मृतदेह सापडल्याच्या घटनांनी परिसरात भीतीचे सावट पसरले आहे. त्यामुळे हा भाग केवळ वाहतूक समस्येपुरता मर्यादित न राहता सुरक्षेच्या दृष्टीनेही धोकादायक ठरत आहे.
दररोज शाळकरी मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिक या मार्गाचा वापर करत असताना, दोन्ही बाजूंनी उभ्या असलेल्या बसेसमुळे त्यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. काही बस चालकांकडून अयोग्य वर्तन, अर्धवस्त्र अवस्थेत फिरणे, तसेच बसच्या आडोशाला मद्यपान व नशा करणाऱ्यांची वाढती संख्या यामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिकांच्या मते, संध्याकाळनंतर हा परिसर टाळण्यासारखा झाला आहे.
लॉकडाऊनपासून या समस्येवर अनेकदा कारवाई झाली, परंतु ती टिकाऊ ठरलेली नाही. आजही सुमारे तीन ते चार किलोमीटरपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूंना बसेस उभ्या असल्याचे चित्र कायम आहे. यामुळे केवळ वाहतूकच नव्हे तर आपत्कालीन सेवा, रुग्णवाहिका यांनाही अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने तात्पुरत्या कारवाईऐवजी कायमस्वरूपी उपाययोजना करणे अत्यावश्यक बनले आहे.
कारवाई होते, पण ती फक्त दाखवण्यासाठीच असते. काही दिवसांनी पुन्हा सगळे पूर्वीसारखेच सुरू होते.” या खासगी बसेस संदर्भात कारवाई होणे अपेक्षित आहे.राजू पटेल समाज सेवक