विरार ः चेतन इंगळे
मुंबई उपनगरी रेल्वेवर वाढत्या प्रवासी ताणाचा प्रश्न सोडवण्यासाठी आणि उत्तर मुंबई ते पालघर परिसरातील नागरीकरणाला गती देण्यासाठी सुरू असलेला विरारदहाणू रेल्वे मार्ग चौपदरीकरणाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे. तब्बल 3,578 कोटींचा खर्च असलेल्या या प्रकल्पातील भूमीअभियानाचे 86 टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित कामालाही गती देण्यात येत आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळ (एमआरव्हीसी) तर्फे हा प्रकल्प राबवला जात आहे.
या मार्गावर आतापर्यंत 23.5 लाख घनमीटर मातीचा भराव आणि 2.18 लाख घनमीटर खोदकाम करण्यात आले आहे. हा टप्पा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो कारण यामुळे पुढील पूल, रुळ बसविणे, तसेच अधोसंरचना उभारणीला गती मिळते. याशिवाय, विविध ठिकाणी पूल व रस्त्याखालील मार्गिका (रुबस) यांच्या कामालाही वेग आला असून अनेक ठिकाणी बांधकाम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे.
विरार व वैतराणा स्थानकांवर सुरक्षा पथक (आरपीएफ व जीआरपी) इमारती, वीज उपकेंद्र, पाणी टाकी आणि गँग टूलरूमचे काम पूर्ण झाले आहे. तसेच, स्थानक इमारत व डेक बांधणीचे काम सुरु आहे. दरम्यान, पालघर, सफाळे, केळवे रोड, बोईसर, वंगाव, उमरोळी व दहाणू येथे नवीन स्थानक इमारती, पादचारी पूल (एफओबी), जोड पूल, कर्मचारी निवास, रिले हाऊस व इतर सुविधा उभारल्या जात आहेत. यापैकी उमरोळी, बोईसर व वंगाव येथील कामे पूर्णत्वाकडे वाटचाल करत आहेत.
संपूर्ण मार्गावर सिग्नल व दूरध्वनीसंबंधी (टेलिकॉम) कामालाही सुरुवात झाली आहे. प्रवासी सुरक्षा आणि रेल्वे गाड्यांच्या सुरळीत वाहतुकीसाठी आवश्यक असलेली केबल टाकण्याची कामे झपाट्याने सुरु आहेत. मात्र, काही ठिकाणी भूमी अधिग्रहण व वनपरवानगी यासारख्या अडथळ्यांमुळे कामाचा वेग कमी झाला असला तरी प्रकल्प स्थिर गतीने पुढे सरकत आहे. हा प्रकल्प वित्त वर्ष 202627 च्या अखेरीस पूर्ण होईल, असा अंदाज अधिकार्यांनी व्यक्त केला आहे.
या चौपदरीकरणामुळे उपनगरी रेल्वे मार्गावरील प्रवासी क्षमता मोठ्या प्रमाणावर वाढणार असून गर्दीचा त्रास कमी होणार आहे. तसेच, गाड्यांची वेळापत्रके अधिक नियमित व वेळेत चालवता येतील. या प्रकल्पामुळे मुंबई,पालघर,डहाणू परिसरातील उद्योगधंद्यांना चालना मिळेल, तर या भागातील नागरीकरणालाही मोठी गती मिळणार आहे. स्थानिक नागरिकांसाठी हा प्रकल्प म्हणजे विकासाचे दार उघडणारा ठरणार आहे.