Virar Dahanu railway project delay Pudhari
पालघर

Virar Dahanu railway project delay: विरार- डहाणू चौपदरीकरण प्रकल्पावर प्रश्नचिन्ह

डहाणू लोकल फेऱ्या वाढविण्यासह 15 डब्यांच्या लोकलची मागणी

पुढारी वृत्तसेवा

सफाळे: विरार ते डहाणू दरम्यान सुरू असलेल्या चौपदरीकरण प्रकल्पाच्या कामकाजावरून प्रकल्पाच्या अंतिम मुदतीबाबत संभ्रम निर्माण झाला असून, काम पूर्णत्वास नेण्याबाबत अनिच्छा आहे का, असा प्रश्न प्रवाशांमध्ये उपस्थित होत आहे. माहिती अधिकार अंतर्गत मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन कडून जून 2027 पर्यंत प्रकल्प पूर्ण होईल, अशी माहिती देण्यात आली असली तरी प्रत्यक्ष कामाचा वेग पाहता ही मुदत गाठणे कठीण असल्याचे चित्र आहे.

विरारवैतरणा, वैतरणासफाळे, सफाळेकेळवे रोड, केळवे रोडपालघर, पालघरउमरोळी, उमरोळीबोईसर, बोईसरवाणगाव आणि वाणगावडहाणू या आठ टप्प्यांमध्ये काम सुरू आहे. काही ठिकाणी माती भराव, ब्लँकेटिंग, रेल्वे रूळ टाकणे, ओव्हरहेड वायरचे खांब उभारणे अशी कामे सुरू असली तरी अनेक ठिकाणी पूल, स्थानक विकास, प्लॅटफॉर्म, पादचारी पूल यांसारखी महत्त्वाची कामे अद्याप सुरूही झालेली नाहीत.

विशेषतः पालघर, बोईसर, वाणगाव व डहाणू या स्थानकांवर प्लॅटफॉर्म व इतर मूलभूत सुविधा उभारणीची कामे प्रलंबित आहेत. सफाळे व काही मोजक्या स्थानकांवरच मर्यादित प्रगती दिसून येते. तसेच अनेक ठिकाणी बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी उभारण्यात येणारे पिलर, स्थानकांचे स्थलांतर, मालवाहतूक यार्ड हलविणे यांसारख्या कारणांमुळे कामाला विलंब होत आहे.

याशिवाय बहुतांश स्थानकांवर नवीन पादचारी पूल उभारणीची कामे सुरू झालेली नाहीत. केळवे रोड येथील पादचारी पुलाची स्थिती गेल्या काही महिन्यांपासून जसच्या तशीच असल्याचे दिसून येते. मे 2026 ते जून 2027 या कालावधीत अवघ्या 15 महिन्यांत, त्यातही पावसाळ्याचे चार महिने वजा केल्यास केवळ 11 महिन्यांत इतक्या मोठ्या प्रमाणावरचे काम पूर्ण करणे अवघड असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

त्यामुळे जाहीर केलेली अंतिम मुदत वास्तववादी आहे का, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. दरम्यान, विरार-डहाणू मार्गावर प्रवासी संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून सध्याच्या अपुऱ्या गाड्यांमुळे प्रवाशांना अत्यंत गैरसोयीचा प्रवास करावा लागत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT