पालघर ःपालघर सिन्नर महामार्गाच्या रुंदीकरणाच्या कामात मनोर बाजारपेठेला वळसा घालून तयार केल्या जाणाऱ्या बायपास रस्त्या विरोधात ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढून निषेध व्यक्त केला. मनोर ग्रामपंचायत हद्दीतील गायकवाड डोंगरी, हायस्कूल डोंगरी ख्वाजा नगर डोंगरी व पोलीस लाईन डोंगरीच्या रहिवासी भागातील घरे बाधित होणार असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. सोमवारी मनोर ग्रामपंचायत कार्यालयात पार पडलेल्या ग्रामसभेत पारीत झालेला ठराव स्थगित करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी मनोर ग्रामपंचायत कार्यालया समोर ठिय्या आंदोलन केले.
पालघर सिन्नर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी राष्ट्रीय महामार्ग अधिनियमा अंतर्गत भूमी अधिग्रहणाची नोटीस 23 सप्टेंबर 2025 रोजीच्या राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहे.महामार्गाच्या रुंदीकरणासाठी पालघर तालुक्यातील कोसबाड,सावरखंड, टाकवहाल, मनोर, नेटाळी, गोवाडे, मासवण, चहाडे, शेलवाली, नंडोरे आणि पालघर या दहा गावांमधील शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित केल्या जाणार आहे.
भूसंपादना बाबची माहिती देण्यासाठी सोमवारी( ता.22)मनोर ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसभा घेण्यात आली होती.ग्रामसभेत भूसंपादना बाबतची माहिती राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अभियंत्यांकडून देण्यात आली. यात मनोर बाजार पेठेला वळसा घालून पर्यायी मार्ग तयार केला जाणार असल्याची माहिती ग्रामस्थांना देण्यात आली.
नियोजित बायपास मार्गात गायकवाड डोंगरी, हायस्कूल डोंगरी ख्वाजा नगर डोंगरी आणि पोलिस लाईन डोंगरी भागातील अनेत घरे बाधित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बायपास मार्गामुळे राहती घरे गमवावी लागणार असुन उपजीविकेवर मोठा परिणाम होणार असल्याची भीती ग्रामस्थांना सतावत असल्यामुळे ग्रामस्थांनी बायपास मार्गाला विरोध करण्याची भूमीका घेतली आहे.
मंगळवारी मोठ्या संख्येने ग्रामस्थ एकत्र आले होते. सकाळी अकरा वाजल्यापासून दुपारी एक वाजेपर्यंत ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी सोमवारच्या ग्रामसभेत झालेला ठराव स्थगित करून नव्याने ग्रामसभा आयोजित करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. ग्रामस्थांच्या विरोधा नंतर ग्रामपंचायत अधिकारी नितीन पवार यांनी 9 जानेवारी 2026 रोजी ग्रामसभा आयोजित करण्याचे आश्वासन आंदोलन करणाऱ्या ग्रामस्थांना दिले.ग्रामसभेत नेमका कोणता निर्णय घेतला जाणार, याकडे सर्व ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
सोमवारी पार पडलेल्या ग्रामसभेत दोनशे पेक्षा अधिक ग्रामस्थ आणि व्यापारी उपस्थित होते.यावेळी महामार्ग विभागाच्या अभियंत्यांनी मनोर बाजार पेठेला बायपास रस्ता तयार केला जाणार असल्याची माहिती दिल्यानंतर टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला होता.