Vikramgad liquor seizure Pudhari
पालघर

Vikramgad liquor seizure: दिवाळीच्या तोंडावर अवैध मद्य वाहतुकीचा पर्दाफाश; २३ लाखांचा मुद्देमाल जप्त

पालघर उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई

पुढारी वृत्तसेवा

पालघर: दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अवैध मद्य विक्री आणि वाहतुकीला आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाईचा धडाका लावला आहे. डहाणू विभाग आणि भरारी पथकाच्या संयुक्त कारवाईत विक्रमगड तालुक्यातील कासा-जव्हार मार्गावरील कुंज शिवारात विदेशी मद्याची अवैध वाहतूक करणारे आयशर वाहन पकडण्यात आले.

या कारवाईत विदेशी मद्याचे तब्बल ४७ बॉक्स जप्त करण्यात आले असून, एकूण २३ लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

दिवाळीच्या काळात मद्याची मागणी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध मद्य विक्री आणि वाहतुकीवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे.

याच मोहिमेदरम्यान कुंज शिवारात संशयास्पद आयशर वाहनातून विदेशी मद्याची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर डहाणू विभाग आणि भरारी पथकाने संयुक्त कारवाई केली.

या कारवाईत वाहनाची तपासणी केली असता विदेशी मद्याचे ४७ बॉक्स आढळून आले. जप्त करण्यात आलेल्या मद्याची किंमत ८ लाख ४ हजार रुपये, तर वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या आयशर वाहनाची किंमत १५ लाख रुपये असल्याचे समोर आले. अशा प्रकारे एकूण २३ लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी वाहनचालकासह मद्याच्या वाहतुकीत सहभागी असलेल्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या अवैध मद्यसाठ्याचा स्रोत आणि त्याची विक्री कोणत्या ठिकाणी केली जाणार होती, याचा पुढील तपास राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सुरू आहे.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या या कारवाईमुळे अवैध मद्य व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. कारवाई उत्पादन शुल्क विभागाचे जिल्हा अधीक्षक गणेश बारगजे यांच्या मार्गदर्शनात भरारी पथकाचे निरीक्षक अरुणकुमार चव्हाण, डहाणूचे निरीक्षक सुनील देशमुख यांच्या पथकाने केली

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT