विक्रमगड: विक्रमगड तालुक्यातील खुडेद ग्रामपंचायत हद्दीतील गारमाळ गावात दरवर्षी पाणीटंचाईचा गंभीर प्रश्न निर्माण होत असून यंदाही ग्रामस्थांसह, पशुधनांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. केवळ 25 कुटुंबांची व सुमारे 105 लोकसंख्येची वस्तीला भौगोलिक उंचीमुळे नियमित पाणीपुरवठा करण्यात अडचणी येत असल्याचे भयाण वास्तव समोर आले आहे.
गारमाळ गावासाठी साखरे येथील तिवसवपाडा परिसरातील नदीलगत असलेल्या विहिरीवरून लघुनळ पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. मात्र अंतर जास्त व गाव उंच ठिकाणी असल्याने नळयोजनेद्वारे पाण्याचा दाब कमी पडतो आणि पाण्याचा प्रवाह गावापर्यंत पूर्ण क्षमतेने पोहोचत नसल्याने परिणामी दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाईची दाहकता वाढत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
गावातील 25 कुटुंबांपैकी सुमारे 13 कुटुंबे कमी उंचीच्या भागात असल्याने त्यांना लघु नळ योजनेद्वारे अंशतः पाणीपुरवठा मिळतो; मात्र उर्वरित 12 कुटुंबे अधिक उंच भागात वास्तव्यास असल्याने त्यांच्यापर्यंत नळ योजनेतील पाणी पोहोचत नाही.
त्यामुळे नळ योजनेद्वारे येणारा मर्यादित पाण्याचा प्रवाह विहिरीमध्ये साठवून त्यावरच ग्रामस्थांना अवलंबून राहावे लागत आहे. सध्या प्रशासनाने पर्यायी नळ योजनेद्वारे पाणीपुरवठा सुरू करून तात्पुरता दिलासा दिला असला तरी दरवर्षी उद्भवणाऱ्या या समस्येवर गारमाळसाठी उंचीचा विचार करून स्वतंत्र जलयोजना, जलस्रोत पुनर्भरण व दीर्घकालीन नियोजन करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत असून प्रशासनाने तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली
गावातील विहिरी उन्हाळ्यात कोरड्या पडत असल्याने महिलांना व नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते. या समस्येबाबत ग्रामपंचायतीकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी करण्यात आली होती. दरम्यान, गारमाळ गावासाठी शासनाची जल जीवन मिशन योजना मंजूर झाली असली तरी ती अद्याप अपूर्ण अवस्थेत असल्याने गावकऱ्यांना अपेक्षित दिलासा मिळालेला नाही. योजना पूर्ण झाल्यास पाणीटंचाईचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटू शकतो, असेही ग्रामपंचायत अधिकारी कविता काळे यांनी सांगितले.