

खानिवडे: वसईतील पेल्हार, सोपारा फाटा परिसरात मुंबई हायवेच्या कडेला झुडपात गोणीत शिर नसलेला मृतदेह सोमवारी( दि.३०) आढळून आला होता. मृतदेहाची ओळख पटविणे कठीण असतानाही पेल्हार गुन्हे शाखेने तपासाची चक्रे फिरवत अवघ्या आठ तासांत दोघांना अटक करत खुनाचा उलगडा केला. अशोक सिंग राजपूत (वय ३२, मूळ रा. राजस्थान) असे खून झालेल्या तरूणाचे नाव असून याप्रकरणी दिनेशकुमार कानाराग प्रजापती (वय २७) व संदीप ब्रम्हदेव तिवारी (वय ३५, विरार) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, घटनास्थळी तपास करताना पोलिसांनी आसपास फिरलेल्या संशयित वाहनांची माहिती गोळा केली. त्याआधारे दिनेशकुमार प्रजापती याला जाबरपाडा येथून ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने आपल्या साथीदार संदीप तिवारी याच्या मदतीने मित्र अशोक सिंग राजपूत (वय ३२, मूळ रा. राजस्थान) याची हत्या केल्याची कबुली दिली.
तपासात पुढे आले की, अशोक सिंग व आरोपी दिनेशकुमार यांच्यात किराणा व्यवसायात भागीदारी होती. आर्थिक वादातून दोघांनी मिळून अशोक सिंगचा धारदार हत्याराने खून केला. ओळख पटू नये म्हणून त्याचे शिर धडापासून वेगळे करून मृतदेह झाडाझुडपात फेकण्यात आला, तर शिर तानसा नदी/खाडी परिसरात टाकण्यात आले. पोलिसांनी तत्काळ ड्रोनच्या साहाय्याने शोध मोहीम राबवून नदीकाठाजवळील झाडाझुडपात मृताचे शिर, मोबाईल फोन व इतर पुरावे हस्तगत केले. फॉरेन्सिक पथकाच्या मदतीने सर्व वस्तू ताब्यात घेण्यात आल्या आहेत. या किचकट प्रकरणाची जलद उकल केल्याबद्दल पेल्हार गुन्हे शाखेच्या पथकाचे कौतुक होत असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.