विश्वनाथ कुडू
खानिवडे: हजारो वर्षांची परंपरा लाभलेल्या रानमेव्याने आजही आपले महत्त्व टिकवून ठेवले असून, उन्हाळ्याच्या दिवसांत आदिवासी व कष्टकरी समाजासाठी तो रोजगाराचे प्रभावी साधन ठरत आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक पारंपरिक गोष्टी मागे पडल्या असल्या तरी रानावनात राहणाऱ्या आदिवासी समाजाची उपजीविका आजही मोठ्या प्रमाणावर रानसंपदेवरच अवलंबून आहे.
उन्हाळा सुरू होताच मध, करवंदे, हाटूरणे, गावठी आंबे, तोरणे, पायरी, पिंपळाची फळे, आवळा, रानफणस, ताडगोळे, भोकर, जाम आणि जांभूळ यांसारख्या रानमेव्याची रेलचेल वसई परिसरातील बाजारात दिसून येत आहे. वर्षातून एकदाच उपलब्ध होणाऱ्या या फळांकडे ग्राहकांचा ओढा वाढत असून, पारंपरिक फळांना पसंती देणाऱ्यांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे.
शहरांमध्ये सहज उपलब्ध न होणाऱ्या या रानफळांचा आस्वाद घेण्यासाठी नागरिक बाजारात गर्दी करताना दिसतात. खेड्यापाड्यांतून आलेल्या आदिवासी महिला टोपल्यांमध्ये रानमेवा विकताना दिसतात. यामुळे त्यांच्या कुटुंबाला आर्थिक हातभार लागत असून, उन्हाळ्याच्या काळात त्यांना हंगामी रोजगाराची संधी उपलब्ध होत आहे.
उन्हाच्या तीव्रतेत शरीराला थंडावा देणाऱ्या या फळांचे औषधी गुणधर्मही महत्त्वाचे मानले जातात. सध्या बाजारात मिळणाऱ्या सफरचंद, संत्री, आंबा, टरबूज, डाळिंब, चिकू, केळी यांसारख्या फळांवर रासायनिक प्रक्रिया होत असल्याने आरोग्यावर त्याचे दुष्परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त केली जाते.
याउलट, रान रानमेवा पूर्णतः नैसर्गिक पद्धतीने वाढत असल्याने तो अधिक सुरक्षित व आरोग्यदायी असल्याचे ग्राहकांचे मत आहे. करवंद हे रानमेव्याचे प्रमुख आकर्षण असून, एप्रिल अखेरपासून जूनपर्यंत सुमारे अडीच महिने आदिवासी बांधवांना रोजगार उपलब्ध करून देते. मात्र करवंद गोळा करणे हे अत्यंत कष्टाचे काम आहे.
उन्हाच्या तडाख्यात जंगलातील काटेरी झुडपांत जाऊन एकेक करवंद खुडून टोपली भरावी लागते. यासाठी पूर्ण दिवस खर्ची पडतो, तर बाजारात विक्रीसाठी आणण्यासाठी आणखी एक दिवस लागतो, असे करवंद विक्रेती जमुना बाई यांनी सांगितले. वसईच्या बाजारात करवंदे, जांभूळ व राजन हे साधारणपणे 10 रुपये प्रति वाटा या दराने विकले जातात.
एका टोपलीत 50 ते 60 वाटे भरले जात असून, दिवसभरात 450 ते 500 रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते, असे विक्रेत्यांनी सांगितले. ताडगोळे हे शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी ते उपयुक्त ठरतात. पूर्वी आदिवासी समाजापुरते मर्यादित असलेले ताडगोळे आता व्यावसायिक स्तरावर आणले आहेत. सध्या डझनभर ताडगोळे 50 ते 70 रुपयांदराने विकले जात आहे.