वसई: वसई-विरार महानगरपालिकेतील प्रभाग समिती निवडणुका अद्यापही प्रलंबित असून यावरून राजकीय वातावरण तापले आहे. ठाणे मुंबईसह राज्यातील विविध महापालिकांच्या विषय समित्या आणि प्रभाग समिती सभापतींच्या निवडणुका पार पडल्या असून, वसई विरार महापालिकेतील या निवडणुकांना मुहूर्त कधी लागेल? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. महापौर अजीव पाटील यांनी या निवडणुका मुद्दामहून रखडवण्यात आल्याचा गंभीर आरोप करत राज्य शासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले आहे.
महापौरांनी सांगितले की, प्रभाग समित्यांची रचना आणि निवडणूक प्रक्रिया वेळेत पूर्ण होणे अपेक्षित होते; मात्र पालिका निवडणूक संपूण आता तीन महिन्यांचा कालावधी उलटून गेला आहे. एकदा जिल्हाधिकाऱ्यांनी या निवडणुका जाहीर केलेल्या नंतर त्या रद्द करण्यात आल्या. त्यानंतर मात्र त्यांचा मुहूर्त पुन्हा लागला नाही.
यामागे राजकीय हस्तक्षेप किंवा जाणूनबुजून टाळाटाळ केली जात असल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. वसई विरार महापालिकेमध्ये नऊ प्रभाग समित्या असून, या समित्यांवर निवडणुकी अभावी अद्याप सभापती कार्यान्वित झालेले नाहीत. तसेच महिला बालकल्याण आणि आरोग्य समिती यासारख्या महत्त्वाच्या समित्यांच्याही निवडणुका न झाल्यामुळे सर्वत्र कामकाज रखडलेले आहे.
त्यामुळे स्थानिक पातळीवरील विकासकामांवरही परिणाम होत असून, त्याचा सर्व भार मुख्यालयावर पडत आहे. यामुळे अनेक विकास कामांसोबतच पावसाळ्यापूर्वी केली जाणारी काही तातडीची कामेही रखडली असून, ती अलीकडील काळात पूर्ण होतील, असे वाटत नाही. यामुळे जनतेचा रोष विद्यमान कार्यकारी बॉडीवर पडावा, यासाठी तर कुणी राजकारण करीत नाही ना? अशी स्पष्ट शंकाच महापौर अजीव पाटील यांनी व्यक्त केली आहे.
याबाबत लवकरच कोकण विभागीय आयुक्तांकडे दाद मागण्यात येणार असून, लवकरात लवकर संबधीत निवडणुका घेण्यात याव्यात, अशी मागणी देखील केली जाणार आहे. तसेच, लोकशाही प्रक्रियेचा अवमान होऊ नये, यासाठी शासन आणि प्रशासनाने याप्रकरणी तत्काळ निर्णय घ्यावा, असेही महापौरांनी यावेळी स्पष्ट केले आहे. दरम्यान, या प्रकरणामुळे सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू होऊन, येत्या काळात हा मुद्दा अधिकच चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.