Vasai Virar Traffic Jam Pudhari
पालघर

Vasai Virar Traffic Jam: गणपती मंदिर ते कोपरीपर्यंत वाहतूककोंडीने नागरिक हैराण; वाहतूक पोलिसांची संख्या वाढवण्याची मागणी

कार्यालयीन कर्मचारी, विद्यार्थी, व्यावसायिक, रिक्षाचालक तसेच अत्यावश्यक कामासाठी प्रवास करणाऱ्या नागरिकांना या कोंडीचा मोठा फटका बसत आहे.

पुढारी वृत्तसेवा

मनवेलपाडा: वसई-विरार शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असताना त्याच वेगाने शहरातील वाहनांची संख्याही वाढत आहे. मात्र, वाढत्या वाहनांच्या तुलनेत वाहतूक व्यवस्थेवर आवश्यक त्या प्रमाणात उपाययोजना होत नसल्याने शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे.

विशेषतः प्रमुख रस्त्यांवर सकाळ-संध्याकाळच्या वेळेत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून, नागरिकांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत आहे.

गणपती मंदिर ते कोपरीपर्यंत वाहतूक कोंडीचे चित्र सध्या नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. या मार्गावर अनेकदा वाहनांची मोठी गर्दी होत असल्याने काही अंतर पार करण्यासाठी नागरिकांना अपेक्षेपेक्षा कितीतरी अधिक वेळ खर्च करावा लागत आहे. कार्यालयीन कर्मचारी, विद्यार्थी, व्यावसायिक, रिक्षाचालक तसेच अत्यावश्यक कामासाठी प्रवास करणाऱ्या नागरिकांना या कोंडीचा मोठा फटका बसत आहे.

शहराचा विस्तार झपाट्याने होत असताना रस्त्यांवरील वाहनांची संख्या वाढत आहे. मात्र, त्यानुसार वाहतूक नियंत्रणासाठी मनुष्यबळ, नियोजन आणि प्रभावी वाहतूक व्यवस्थापन यांची गरज निर्माण झाली आहे. वाहतूक पोलिसांची संख्या वाढवून गर्दीच्या ठिकाणी कायमस्वरूपी वाहतूक नियंत्रण व्यवस्था उभी करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

दररोज निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांच्या वेळेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. काही वेळा वाहतूक कोंडी इतकी वाढते की, काही मिनिटांच्या अंतरासाठी नागरिकांना बराच वेळ रस्त्यावरच अडकून राहावे लागते. त्यामुळे कामावर वेळेत पोहोचणे, विद्यार्थ्यांना शाळा-कॉलेज गाठणे तसेच रुग्णांना रुग्णालयात नेणे यांसारख्या बाबींवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.

शहरातील वाढती लोकसंख्या आणि वाहनांची संख्या लक्षात घेता भविष्यात वाहतूक कोंडी आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे केवळ कोंडी झाल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्याऐवजी कोंडी होऊ नये यासाठी आधीच नियोजन करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

वाहतूक कोंडीची समस्या वारंवार उद्भवत असताना प्रशासनाकडून नेमक्या कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत? वाहतूक पोलिसांची संख्या पुरेशी आहे का? गर्दीच्या मार्गांवर अतिरिक्त मनुष्यबळ का तैनात केले जात नाही? तसेच वाढत्या वाहनसंख्येचा विचार करून दीर्घकालीन वाहतूक आराखडा तयार करण्यात आला आहे का? असे अनेक प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत.

योग्य त्या ठिकाणी सिग्नल उपलब्ध करणे गरजेचे

वसई-विरारच्या नागरिकांना रोजच्या प्रवासात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू नये यासाठी वाहतूक पोलिसांचे मनुष्यबळ वाढवणे, गर्दीच्या ठिकाणी अतिरिक्त वाहतूक कर्मचारी तैनात करणे, वाहतुकीचे प्रभावी नियोजन करणे योग्य त्या ठिकाणी सिग्नल उपलब्ध करणे गरजेचे आहे आणि आवश्यक त्या ठिकाणी रस्ते व्यवस्थेत सुधारणा करणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. आता तरी प्रशासनाने ठोस पावले उचलणार का, की वसई-विरारकरांना दररोजच्या वाहतूक कोंडीशीच झगडत राहावे लागणार? हा प्रश्न सध्या नागरिकांसमोर उभा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT