Vasai Virar News Pudhari
पालघर

Vasai Virar News: साथरोग रोखण्यासाठी वसई-विरार मनपा सज्ज

४१६ वैद्यकीय पथके सज्ज, पालिकेकडून युद्धपातळीवर उपाययोजना सुरू

पुढारी वृत्तसेवा

मनवेलपाडा: गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे वसई-विरार शहरातील अनेक भाग जलमय झाले होते. अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले, तर घरगुती साहित्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

मात्र आता पूरस्थिती ओसरताच वसई-विरार महानगरपालिकेने आपले लक्ष संभाव्य साथीच्या रोगांवर केंद्रित केले असून, शहरभर आरोग्य सुरक्षेसाठी युद्धपातळीवर उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत.

पूराचे पाणी ओसरल्यानंतर डासांची वाढ, दूषित पाणी, साचलेला कचरा आणि अस्वच्छतेमुळे डेंग्यू, मलेरिया, लेप्टोस्पायरोसिस, गॅस्ट्रो, टायफॉईड यांसारख्या संसर्गजन्य आजारांचा धोका वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन महापालिकेने तब्बल ४१६ वैद्यकीय पथके कार्यरत केली आहेत. ही पथके विविध भागात जाऊन नागरिकांची आरोग्य तपासणी, औषधोपचार, जनजागृती आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवत आहेत.

महापालिकेच्या आरोग्य विभागाने पूरग्रस्त परिसरात घराघरांत जाऊन नागरिकांच्या प्रकृतीची चौकशी सुरू केली आहे. ताप, सर्दी, उलट्या, जुलाब किंवा इतर संसर्गाची लक्षणे आढळणाऱ्या नागरिकांवर तातडीने उपचार केले जात आहेत. त्याचबरोबर संशयित रुग्णांची नोंद घेऊन त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवले जात आहे.

शहरातील साचलेले पाणी हटविणे, गटारांची साफसफाई, रस्त्यांवरील चिखल हटविणे, कचऱ्याची विल्हेवाट लावणे तसेच डासांच्या उत्पत्तीवर नियंत्रण मिळवण्यासाठी फॉगिंग आणि औषध फवारणीची मोहीमही वेगाने सुरू आहे. पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेची तपासणी करण्यात येत असून, आवश्यक त्या ठिकाणी निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया केली जात आहे.

महापालिकेने नागरिकांनाही सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. पिण्यासाठी उकळलेले किंवा शुद्ध पाणी वापरणे, घराच्या परिसरात पाणी साचू न देणे, वैयक्तिक स्वच्छता राखणे आणि ताप किंवा इतर आजाराची लक्षणे दिसल्यास त्वरित जवळच्या आरोग्य केंद्रात संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पूरानंतर केवळ परिस्थिती पूर्ववत करण्यावर भर न देता संभाव्य आरोग्य संकट टाळण्यासाठी महापालिकेने प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर विशेष भर दिला आहे. आरोग्य विभाग, स्वच्छता विभाग आणि इतर यंत्रणा समन्वयाने काम करत असून, शहरातील परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे.

दरम्यान, पूरग्रस्त नागरिकांनीही प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करण्याची गरज व्यक्त होत आहे. योग्य वेळी उपचार, स्वच्छता,जनजागृतीच्या माध्यमातून रोगांचा धोका कमी करण्यासाठी प्रशासनाने व्यापक तयारी केली आहे.

वसई -विरार पूर्ववत होतय

नुकत्याच झालेल्या पावसामुळे वसई-विरारमध्ये मोठ्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी पुराच्या पाण्याने घरांचे ,शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच मुसळधारेनंतर विज आणि आरोग्याची मोठी समस्या वसई-विरारमध्ये निर्माण झाली आहे.

विज समस्या सोडवण्यासाठी महावितरणकडून शर्थीचे प्रयत्न सुरू झाले आहेत. तर आरोग्य यंत्रणा सज्ज झाली असून आरोग्य विभागाकडून वैद्यकीय पथके सज्ज करण्यात आली असून , औषधोपचार, जनजागृती आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT