वसई विरार महापालिका pudhari photo
पालघर

Vasai Virar Municipal Corporation: वसई-विरार महापालिकेत पुढील सत्ता हालचालींना वेग; समित्यांच्या अध्यक्षपदावर कोणाची वर्णी?

महापौर-उपमहापौरपदावर बविआचे वर्चस्व कायम; स्वीकृत नगरसेवक आणि विरोधी पक्षनेतेपदावर राजकीय चर्चा रंगात

पुढारी वृत्तसेवा

विरार : वसई-विरार शहर महानगरपालिकेतील महापौर आणि उपमहापौर पदाची निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता सत्ताधारी गोटात पुढील राजकीय हालचालींना वेग आला आहे. महापौरपदी बहुजन विकास आघाडीचे अजीव पाटील यांची निवड झाल्यानंतर, उपमहापौरपदासाठीही बहुजन विकास आघाडीचेच वर्चस्व कायम राहिले आहे. या घडामोडींनंतर आता महानगरपालिकेतील विविध महत्त्वाच्या समित्या आणि त्यावरील पदांवर कोणाची वर्णी लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

महानगरपालिकेच्या स्थायी समिती, महिला व बालविकास समिती, आरोग्य समिती तसेच वृक्ष प्राधिकरण समिती यांसारख्या महत्त्वाच्या समित्यांवर सभापती पदासाठी कोणत्या नगरसेवकाची निवड होणार, याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. विशेषतः बहुजन विकास आघाडी कोणत्या विश्वासू नगरसेवकांना किंवा नव्या चेहऱ्यांना संधी देणार, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.

दरम्यान, दहा स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती हा विषयही सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. कोणत्या पक्षाला किती स्वीकृत नगरसेवक मिळणार, तसेच त्या नगरसेवकांची निवड लॉटरी पद्धतीने होणार की पक्षीय शिफारसीनुसार, याबाबत उत्सुकता वाढली आहे. स्वीकृत नगरसेवक हे महानगरपालिकेतील महत्त्वाचे आणि प्रभावी घटक मानले जात असल्याने, या नियुक्त्यांना विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. विरोधी पक्षनेतेपदासाठी कोणाची निवड होणार, याबाबतही चर्चा रंगू लागली आहे. महापालिकेतील महत्त्वाच्या आणि प्रभावी पदांवर भाजपकडून अनुभवी, आक्रमक आणि संघटनात्मक ताकद असलेल्या नगरसेवकाची निवड केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे येत्या काळात भाजप आणि बहुजन विकास आघाडी यांच्यात राजकीय रणनीती अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

महानगरपालिका निवडणुकीत बहुजन विकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाल्याने, समित्यांवरील बहुतांश पदांवर आघाडीचे वर्चस्व राहण्याची शक्यता आहे. मात्र, भाजपकडूनही काही महत्त्वाच्या पदांसाठी ज्येष्ठ आणि प्रभावी नगरसेवकांची नावे पुढे केली जात असल्याचे समजते.

दहा स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती, विविध समित्यांचे सभापतीपद आणि विरोधी पक्षनेतेपद याबाबतची अंतिम प्रक्रिया येत्या 20 फेब्रुवारीपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. या सर्व राजकीय घडामोडींमुळे वसईविरार महानगरपालिकेतील राजकारण पुन्हा एकदा तापले असून, सत्ताधारी आणि विरोधकांमधील शक्तीपरीक्षण लवकरच पाहायला मिळणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT