अजीव पाटील, शेखर धुरी pudhari photo
पालघर

Mayor selection Vasai Virar : वसई-विरार महापौरपदासाठी अजीव पाटील, शेखर धुरी नावाची चर्चा

महापौरपद सर्वसाधारण गटासाठी आरक्षीत झाल्याने इच्छुकांच्या संख्येत वाढ, निवडीकडे सर्वांचे लक्ष

पुढारी वृत्तसेवा

वसई : अनिलराज रोकडे

वसई विरार महापालिकेच्यामहापौर पदाच्या आरक्षणाची गुरुवारी सोडत निघाली असून, हे पद सर्वसाधारण उमेदवारासाठी खुले असणार आहे. मंत्रालयातून आरक्षण जाहीर होताच खुल्या प्रवर्गातील नगरसेवकांच्या आशा पल्लवीत झाल्या असून, त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. या महापालिकेत एकूण 115 पैकी बहुजन विकास आघाडी आणि मित्रपक्ष मिळून 71 नगरसेवक निवडून आले असून, मंगळवारीच बविआने आपल्या गटाची स्थापना करून माजी महापौर प्रवीण शेट्टी यांची गटनेता म्हणून निवड केली आहे.

सत्तापदांच्या वाटपात बविआ अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांचा शब्द अंतिम मानला जातो. गेल्या टर्ममध्ये एकदा महापौरपद भूषवून झाले असल्याने आणि आता गटनेते बनले असल्याने शेट्टी हे महापौरापदाच्या रेसमधून बाहेर पडले असून, बविआतील तीन ते चार दिग्गज नगरसेवकांपैकी कुणा एकाच्या गळ्यात प्रतिष्ठेची ही माळ पडते, यावर वसईकरात तर्कवितर्क सुरू झाले आहेत.

वसई विरारसाठी खुल्या प्रवर्गातील आरक्षण जाहीर झाल्यावर आज सायंकाळी आमदार हितेंद्र ठाकूर यांना प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले, आमच्याकडे महापौरपदासाठी विकासाची दुरदृष्टी असलेले अनुभवी आणि लायक असे अनेक चेहरे असून, बविआतील ज्येष्ठ मंडळी आणि नगरसेवक यांच्याशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल. गेल्या साडेपाच वर्षातील अनागोंदी आणि प्रशासकीय मनमानीमुळे विस्कटलेली शहराची घडी नीट सावरण्यासाठी, तसेच पुढील विकासाची प्रक्रिया वेगवान करण्यासाठी एक सक्षम चेहरा शहराच्या महापौर पदासाठी दिला जाईल.

हितेंद्र ठाकूर यांचा सत्तापदांचे वाटप करताना, त्या उमेदवाराचे पक्षातील कार्य, निष्ठा, जात, प्रांत आणि क्षमता या निकषांचा सारासार विचार करून सोशल इंजिनिअरिंग साधत निवडी करण्यात आल्याचा पूर्व इतिहास आहे. अश्या निवडीबाबत राजकीय निरीक्षकांचे अंदाज आणि झालेली पूर्वचर्चा फोल ठरवत धक्कादायक निर्णय ठाकुरांनी घेतल्याचे अनेकदा अनुभवास आलेले आहे. यंदाच्या निवडणुकीत भाजपा शिवसेनेसोबत कडवी झुंज देताना, बविआच्या काही प्रस्थापितांना घरी बसावे लागले आहे. परंतु अशाही संघर्षाच्या परिस्थितीत अनेक प्रस्थापितांनी पुन्हा महापालिकेत प्रवेश मिळविला आहे. त्यातील एक प्रमुख नाव म्हणजे पक्षाचे संघटक सचिव अजीव पाटील हे आहे.

खुल्या प्रवर्गाचे आरक्षण जाहीर होताच, महापौरपदाच्या शर्यतीत पाटील यांचे नाव सर्वप्रथम घेतल्या जात आहे. पाटील हे आमदार हितेंद्र ठाकूर यांचे सख्खे आतेभाऊ असून, पक्षाच्या जडणघडण आणि विस्तारात त्यांचा सुरुवातीपासून वाटा राहिला आहे. ठाकूर यांच्या कौटुंबिक आणि राजकीय अशा उभयपक्षी संघर्षाच्या काळात अजिव पाटील यांनी खांद्याला खांदा लावून निष्ठापूर्वक कामगिरी बजावली आहे.

त्याचबरोबर यंदा प्रभाग क्रमांक चार मधून निवडणुक लढवीत, ढासळलेल्या बालिकिल्ल्यामध्ये बविआला संजीवनी देण्याचे काम पाटील यांनी साधले आहे. विरार पूर्वेतील 19 जागा जिंकून दाखवत त्यांनी आपले नेतृत्व सिद्ध केले आहे. विरार पूर्व परिसरात गेल्या काही वर्षांपासून विविध समस्या प्रलंबित होत्या. पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था, वसई-विरार महापौरपदासाठी अजीव पाटील,शेखर धुरी नावाची चर्चा ड्रेनेज व्यवस्था, आरोग्य सेवा, शिक्षण सुविधा आदी प्रश्न नागरिकांसमोर होते. या सर्व बाबींवर अजिंक्य पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा करत ठोस उपाययोजना केल्या. त्यामुळेच नागरिकांचा त्यांच्यावरचा विश्वास अधिक दृढ झाला आहे. हा भाग लक्षात घेता बविआ नेतृत्वाकडून त्यांच्या नावावर प्राधान्याने विचार केला जाईल, असा अंदाज व्यक्त होत आहे.

गेल्या विधानसभेपासून बविआ आणि भाजप महायुती असा संघर्ष वसईमध्ये उफाळला असून, त्याची परिणती गेल्यावेळी विधानसभेत तिन्ही उमेदवारांच्या पराभवात झाली. वसई मतदार संघातून दस्तूर खुद्द हितेंद्र ठाकूर यांना भाजपाच्या नवख्या उमेदवार सौ स्नेहा दुबे पंडित यांच्यासमोर आश्चर्यजनक मात खावी लागली. या पार्श्वभूमीवर भाजपकडून महापालिका ताब्यात घेण्याचा प्रयत्न या निवडणुकीत झाला. महायुतीला 44 जागा जिंकत घवघवीत यश सुद्धा मिळाले. या निवडणुकीच्या अगदी तोंडावर बविआच्या पत्थ्यावर पडणारी एक घटना घडली.

भाजपचे 40 वर्षाहून अधिक काळ निष्ठेने काम करणारे ज्येष्ठ पदाधिकारी शेखर धुरी पक्षाने उमेदवारी नाकारली म्हणून अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी बंडखोरी करून बवीआ मध्ये आले. आणि त्यांना बविआने प्रभाग क्रमांक 26 मधून उमेदवारी देत निवडूनही आणले. यावेळी झालेल्या प्रचार काळात धुरी यांनी वसईच्या भाजप नेतृत्वावर प्रचंड कडाडून टीका केली. तशी या निवडणुकीत अन्य कुणाकडूनही झाली नाही. ठाकूर यांच्यासमोर भाजपची वाढलेली डोकेदुखी आणि हातातील गेलेली वसई विधानसभा यांचा सारासार विचार करता, त्यांच्याकडून राजकीय खेळी खेळल्या जाण्याची सुद्धा शक्यता व्यक्त होत आहे.

राज्यात ना. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करून, 40 आमदारांसह ते भाजपासोबत गेले. त्यावेळी मोदी-शहांकडून उद्धव ठाकरे यांची शिवसेना संपविण्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण रणनीती आखत, मुख्यमंत्रीपदी शिंदे यांना बसवून काट्याने काटा काढण्याचा फार्मूला वापरला गेला. साधारण तशीच राजकीय परिस्थिती सद्या असलेल्या वसईत, वाढत्या भाजपाचे आव्हान परतविण्यासाठी मोदी-शहा यांनी वापरलेली रणनीती हितेंद्र ठाकूर यांच्याकडूनही संभवते. अशावेळी ते महापौरपदाची माळ शेखर धुरी यांच्याही गळ्यात टाकू शकतात.

सन 1986 साली आशिया खंडातील उत्पन्नाने व लोकसंख्येने सर्वात मोठी असलेल्या नवघर या वसई तालुक्यातील ग्रामपंचायतीचे सरपंचपद तब्बल 10 वर्षे शेखर धुरी यांनी उपभोगले असून, त्यानंतर येथे अस्तित्वात आलेल्या नवघर माणिकपूर नगरपरिषदेतही 2000 साली निवडून येत, नगरसेवक आणि सभापतीपद त्यांनी उपभोगले आहे.तसेच यंदा निवडून आलेल्या बविआ नगरसेवकांमध्येही ते सर्वात ज्येष्ठ आहेत. त्यामुळे यंदाच्या महापौरपदासाठी त्यांचे नाव पुढे आले तर आश्चर्य वाटायला नको , असाही अंदाज बांधला जात आहे.

ठाकूर यांना भविष्यात वसई विधानसभा बविआकडे खेचायची आहे. ते स्वतः जरी पुढील विधानसभा लढविण्याची शक्यता नसली. तरी नालासोपाराच्या तुलनेत सुरक्षित मतदार संघ म्हणून आपले पुत्र क्षितिज ठाकूर यांना वसईतून उमेदवारी देऊ शकतात. वसई विधानसभेचा गड मजबूत करण्यासाठी म्हणूनही यावेळी वसईतील उमेदवारालाच महापौरपद देण्याचा डाव खेळला जाऊ शकतो. या अंगानेही या पदासाठी शेखर धुरी यांची वर्णी लागण्याची शक्यता अधिक आहे.बहुजन विकास आघाडीने 35 वर्षांच्या राजकीय वाटचालीत सर्वधर्मसमभावाचा पुरस्कार केलेला आहे.

वसई विरारमधील मुस्लिम आणि ख्रिस्ती अल्पसंख्यांकांची संख्या लक्षात घेऊन 2009 साली प्रथम उपमहापौर म्हणून सगीर डांगे या मुस्लिम नगरसेवकाची वर्णी लागली होती. तर यापूर्वीच्या मावळत्या कार्यकारी मंडळात उपमहापौरपदाची संधी प्रकाश रॉड्रिक्स या ख्रिस्ती कार्यकर्त्यास मिळाली होती. अपवादात्मक परिस्थितीत अल्पसंख्यांकांची मर्जी राखण्याचा विचार झाल्यास वसई-कोळीवाडा प्रभागातून निवडून गेलेले अफिफ जमील शेख यांचा किंवा वसई पश्चिमेच्या निर्मळ-वाघोली प्रभागातून निवडून गेलेले लॉरेल डायस यांचाही विचार संभवतो.

अपवादात्मक परिस्थितीत होऊ शकतो यांचाही विचार!

बहुजन विकास आघाडीने आपल्या 35 वर्षांच्या राजकीय वाटचालीत सर्वधर्मसमभावाचा पुरस्कार केलेला आहे. वसई विरार महानगरातील मुस्लिम आणि ख्रिस्ती अल्पसंख्यांकांची लक्षणीय संख्या लक्षात घेऊन 2009 साली प्रथम उपमहापौर म्हणून सगीर डांगे या मुस्लिम नगरसेवकाची वर्णी लागली होती. तर यापूर्वीच्या मावळत्या कार्यकारी मंडळात उपमहापौरपदाची संधी प्रकाश रॉड्रिक्स या ख्रिस्ती कार्यकर्त्यास मिळाली होती.

अपवादात्मक परिस्थितीत अल्पसंख्यांकांची मर्जी राखण्याचा विचार झाल्यास वसई-कोळीवाडा प्रभागातून निवडून गेलेले अफिफ जमील शेख यांचा किंवा वसई पश्चिमेच्या निर्मळ-वाघोली प्रभागातून निवडून गेलेले लॉरेल डायस यांचाही विचार संभवतो. या दोघांनाही स्थानिक स्वराज्य संस्थेतील कामाचा पूर्वानुभव असून, यापूर्वी त्यांनी बविआसाठी जबाबदारीच्या कामगिरी निभावल्या आहेत. यांचा महापौरपदासाठी विचार न झाल्यास, तो उपमहापौरपदासाठीही होऊ शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT