वसई : वसई-विरार महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी बहुजन विकास आघाडीच्या तीन आणि भाजपच्या एका नगरसेवकाने नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे. तर उपमहापौरपदाच्या निवडणुकीकरीता बविआने दोन, तर भाजपच्या एका नगरसेवकाने नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे. महापौर आणि उपमहापौर पदाची निवड करण्यासाठी वसई-विरार शहर महानगरपालिकेची विशेष बैठक मंगळवार दि.03/02/2026 रोजी दुपारी वसई-विरार शहर महानगरपालिका मुख्यालय, सर्वसाधारण सभागृह, 4 था मजला, यशवंत नगर, विरार (प.) येथे घेण्यात येईल.
वसई-विरार महानगरपालिकेच्या निवडणूकित एकूण 115 पैकी 66 जागा जिंकत बहुजन विकास आघाडी हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. ही निवडणूक बहुजन विकास आघाडीने काँग्रेस आणि मनसे यांना सोबत घेऊन संयुक्त आघाडी करून लढली. बहुजन विकास आघाडीच्या मित्रपक्षांना, काँग्रेसला चार तर मनसेला एका जागी यश मिळाले. बहुजन विकास आघाडी आणि मित्र पक्षांना एकूण 71 जागा मिळाल्या आहेत. तसेच या निवडणुकीत भाजपला 43 तर भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेची एक जागा मिळून महायुतीला एकूण 44 जागा मिळालेल्या आहेत.
वसई-विरार शहर महानगरपालिका महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीकरता उमेदवारांनी 30 जानेवारी रोजी नामनिर्देशनपत्र सादर केली आहेत. बहुजन विकास आघाडीच्या वतीने महापौरपदासाठी अजीव यशवंत पाटील, प्रफुल्ल जगन्नाथ साने आणि निशाद अरुण चोरघे यांनी आपली नावे दाखल केली आहेत. तर भारतीय जनता पार्टीच्या वतीने ॲड. दर्शना त्रिपाठी-कोटक यांनी अर्ज दाखल केला आहे. उपमहापौर पदासाठी बहुजन विकास आघाडीच्या वतीने मार्शल डॉमनिक लोपीस, कन्हैया (बेटा) मनोहर भोईर तर भाजपच्या वतीने नारायण सुरेश मांजरेकर यांनी अर्ज दाखल केला आहे.
मते समसमान मिळाल्यास निवडणुकीचा निकाल चिठ्ठ्या टाकून होणार सोडत
महापौर आणि उपमहापौरपदाची निवड करण्यासाठी मंगळवार, 3 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 01.00 वाजता होणाऱ्या विशेष बैठकित महापौर व उपमहापौर पदासाठी प्राप्त झालेल्या नामनिर्देशन पत्रांची छाननी करणे, महापौर व उपमहापौर पदासाठी प्राप्त झालेल्या नामनिर्देशन पत्रांची छाननी अंती वैध नामनिर्देशित उमेदवारांची यादी जाहीर करणे, नामनिर्देशन पत्र मागे घेणे, महापौर व उपमहापौर पदासाठी उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करणे, महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी आवश्यकता भासल्यास हात वर करून मतदान घेणे, या प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहेत. मतदानाअंती उमेदवारांना मते समसमान मिळाल्यास निवडणुकीचा निकाल चिठ्ठ्या टाकून सोडतीद्वारे घेण्यात येईल. निवडून आलेल्या उमेदवाराचे नाव पीठासीन अधिकाऱ्यांमार्फत जाहीर करण्यात येईल, असे वसई-विरार महापालिकेने कळविले आहे.