Vasai Virar Gaushala Protest Pudhari
पालघर

Vasai Virar Gaushala Protest: गौशाळा तोडक कारवाई विरोधात हिंदू संघटना रस्त्यावर, पालिकेवर आक्रोश मोर्चा

महापालिका मुख्यालयात पोहोचल्यानंतर आंदोलकांच्या शिष्टमंडळाने उपायुक्त हर्षला राणे यांना मागण्यांचे निवेदन सादर केले.

पुढारी वृत्तसेवा

खानिवडे: वसई-विरार महापालिका प्रभाग समिती ‌‘ई‌’ अंतर्गत शनिमंदिर शेजारील गौशाळेवर करण्यात आलेल्या तोडक कारवाईच्या निषेधार्थ रविवारी समस्त हिंदू संघटना आणि भारतीय जनता पक्षाच्या वतीने महापालिकेवर विराट आक्रोश मोर्चा काढण्यात आला. ‌

‘गोमातेचा जयजयकार‌’, ‌‘गोमाता रडते आहे, प्रशासन झोपते आहे‌’ आणि ‌‘गोसंवर्धन सुरू करा‌’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडत मोर्चेकऱ्यांनी गौशाळेपासून महापालिका मुख्यालयापर्यंत पायी मार्च काढला.

मोर्चात विविध हिंदू संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भाजपचे लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महापालिका मुख्यालयात पोहोचल्यानंतर आंदोलकांच्या शिष्टमंडळाने उपायुक्त हर्षला राणे यांना मागण्यांचे निवेदन सादर केले.

हिंदू संघटनांच्या म्हणण्यानुसार, संबंधित गौशाळेवर महापालिकेकडून आतापर्यंत पाच वेळा तोडक कारवाई करण्यात आली आहे. यातील एका कारवाईदरम्यान एका गायीला गंभीर दुखापत झाल्याचा आरोप करत या घटनेमुळे हिंदू समाजात तीव्र संताप निर्माण झाल्याचे आंदोलकांनी सांगितले. स्थानिक लोकप्रतिनिधींनी कारवाई थांबविण्यासाठी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

निवेदनाद्वारे आंदोलकांनी प्रशासनाच्या कथित दुटप्पी भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. शहरातील शासकीय व गुरचरण जमिनींवरील अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामे आणि बेकायदेशीर धार्मिक स्थळांवर समान निकषांनुसार कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. गोमातेला चरण्यासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्यासह गौशाळांवरील कारवाई थांबविण्याचीही मागणी करण्यात आली.

येत्या 15 दिवसांत प्रशासनाने सर्व प्रकारच्या अनधिकृत बांधकामांवर समान पद्धतीने कारवाई करावी, अन्यथा यापेक्षाही व्यापक आणि तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा हिंदू संघटनांच्या वतीने देण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT