विरार : वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाचा कारभार नेमका कोणाच्या सोयीसाठी सुरू आहे, असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे. शहरातील अनेक भागांमध्ये नियमितपणे कचरा उचलण्यासाठी महापालिकेची वाहने वेळेवर पोहोचत नसल्याने नागरिकांना कचऱ्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.
एकीकडे कचरा संकलनासाठी वाहनांची कमतरता असल्याचे चित्र दिसत असताना दुसरीकडे विरार पूर्वेतील मनवेलपाडा परिसरात महापालिकेचीच सुमारे १५ ते २० कचरा वाहतूक करणारी वाहने धूळ खात उभी असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. यातील अनेक वाहने वापराविना पडून असून त्यांची अवस्था भंगारासारखी झाली आहे. त्यामुळे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या नियोजनावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मनवेलपाडा परिसरातील मोकळ्या जागेत महापालिकेची अनेक लहान-मोठी कचरा वाहतूक करणारी वाहने एकाच ठिकाणी उभी असल्याचे चित्र दिसत आहे. या वाहनांची योग्य देखभाल होत नसल्याचेही त्यांच्या सद्यस्थितीवरून जाणवते. काही वाहनांच्या बाह्य भागावर धूळ आणि मातीचे थर साचले आहेत, तर काही वाहने दीर्घकाळापासून वापरात नसल्याचे दिसून येते.
या वाहनांच्या मागील बाजूस झाडाझुडपांचा आणि वाहनांचा आडोसा मिळत असल्याने तेथे धूम्रपान, नशा आणि मद्यपान करणाऱ्यांचा वावर असल्याची स्थानिकांची तक्रार आहे. त्यामुळे महापालिकेच्या निष्क्रिय वाहनांमुळे केवळ जागेचा अपव्यय होत नसून परिसरातील सामाजिक सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
विशेष म्हणजे, या पडीक वाहनांच्या अगदी समोरच वसई-विरार शहर महानगरपालिकेचे आपले दवाखाना असून त्याच्या शेजारीच महापालिकेची अभ्यासिका आहे. दवाखान्यात उपचारासाठी महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुले येत असतात, तर अभ्यासिकेत विद्यार्थी अभ्यासासाठी ये-जा करतात.
अशा महत्त्वाच्या सार्वजनिक सुविधांच्या अगदी जवळ मद्यपान आणि नशा करणाऱ्यांचा वावर असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. विशेषतः महिला आणि विद्यार्थिनींना या परिसरातून जाताना असुरक्षित वाटत असल्याच्या तक्रारी आहेत. सार्वजनिक आरोग्य सुविधा आणि विद्यार्थ्यांसाठीची अभ्यासिका उभारणाऱ्या महापालिकेने त्याच परिसरातील सुरक्षिततेकडे मात्र दुर्लक्ष केले आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे.
याशिवाय याच परिसरातून मनवेलपाडा गाव तसेच नालासोपारा परिसराकडे जाण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर ये-जा सुरू असते. त्यामुळे महिला, लहान मुले, विद्यार्थी आणि पादचाऱ्यांना या मार्गाचा वापर करावा लागतो. पडीक वाहनांच्या आडोशाला मद्यपान किंवा नशा करणाऱ्यांचा वावर असल्यास या मार्गावरून जाणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अधिक गंभीर बनतो.
विशेषतः संध्याकाळी आणि रात्रीच्या वेळी महिलांना व विद्यार्थिनींना या भागातून जाणे असुरक्षित वाटू शकते. त्यामुळे या ठिकाणी तातडीने पाहणी करून अनधिकृत वावर रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची गरज आहे.
या वाहनांची प्रशासनाने तातडीने पाहणी करावी
एका बाजूला स्वच्छ आणि सुंदर शहराचा नारा दिला जात असताना दुसऱ्या बाजूला महापालिकेचीच कचरा वाहतूक करणारी वाहने अशा प्रकारे पडून राहणे आणि त्याच जागेचा वापर मद्यपान व नशा करण्यासाठी होत असल्याच्या तक्रारी समोर येणे ही गंभीर बाब आहे. महापालिका प्रशासनाने या वाहनांची तातडीने पाहणी करून वापरण्यायोग्य वाहने दुरुस्त करावीत, बंद वाहनांचा तपशील सार्वजनिक करावा आणि निकामी वाहनांच्या विल्हेवाटीबाबत पारदर्शकता ठेवावी. त्याचबरोबर पडीक वाहनांच्या आडोशाला होणारा गैरवापर रोखण्यासाठी नियमित गस्त, परिसराची स्वच्छता आणि आवश्यक सुरक्षा उपाययोजना कराव्यात.
आपले दवाखाना आणि अभ्यासिकेसारख्या सार्वजनिक सुविधांच्या परिसरात नागरिकांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणे ही महापालिकेची जबाबदारी आहे. अन्यथा, स्वच्छतेच्या दाव्यांसोबतच महिला आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबतही प्रशासनाला नागरिकांच्या प्रश्नांना सामोरे जावे लागणार आहे.