Electricity  Pudhari
पालघर

Vasai Virar power demand: वसई-विरारमध्ये विजेच्या मागणीत मोठी वाढ; उष्णतेमुळे वीज वापर विक्रमी पातळीवर

संपूर्ण वसई-विरार पट्ट्यात विजेवरील ताण अधिक वाढल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

पुढारी वृत्तसेवा

विरार: वसई-विरार शहरात यंदाच्या वाढत्या उष्णतेमुळे विजेच्या वापरात मोठी वाढ झाली असून, घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक क्षेत्रात वीजेची मागणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. एप्रिल व मे महिन्यात तापमानाने 35 ते 40 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडल्याने नागरिकांकडून पंखे, शीतकरण यंत्रणा, थंडावा देणारी उपकरणे तसेच इतर विद्युत साधनांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. परिणामी संपूर्ण वसई-विरार पट्ट्यात विजेवरील ताण अधिक वाढल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

महावितरणच्या वसई विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या महिन्यात तब्बल 332 मेगावॅटची वीज मागणी नोंदवण्यात आली आहे. विशेष म्हणजे वसई, विरार आणि वाडा परिसरात ग्राहकांची संख्या सातत्याने वाढत असून, या भागात सुमारे 3 हजार नव्या ग्राहकांनी वीज जोडणी घेतल्याचे सांगण्यात आले आहे.

त्यामुळे आधीच वाढलेल्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर विजेचा वापर आणखी वाढत चालला आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, तालुक्यातील वीज पुरवठा केंद्रात मार्च महिन्यात 270 मेगावॅट इतकी मागणी होती. मात्र एप्रिल महिन्यात ती थेट 285 मेगावॅटपर्यंत पोहोचली.

त्यानंतर मे महिन्यात मागणीने आणखी वेग घेत तब्बल 295 मेगावॅटचा टप्पा गाठला आहे. दुसरीकडे वसई केंद्रात 257 मेगावॅटवरून 287 मेगावॅटपर्यंत मागणी वाढल्याची नोंद करण्यात आली आहे. या आकडेवारीवरून शहरातील वाढत्या लोकसंख्येसोबतच विजेच्या वापरातील वाढ स्पष्ट होत आहे.

वाढत्या मागणीमुळे वीज वितरण यंत्रणेवर मोठा ताण निर्माण झाला असून, काही ठिकाणी तांत्रिक बिघाड होण्याची शक्यता देखील वाढली आहे. विशेषतः जुन्या विद्युत वाहिन्या, रोहित्रे आणि उपकेंद्रांवर अतिरिक्त भार पडत असल्याने नागरिकांनी विजेचा वापर जपून करण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. अनावश्यक दिवे, वातानुकूलन यंत्रणा आणि इतर उपकरणांचा वापर टाळून वीज बचतीकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे.

दरम्यान, दिवसेंदिवस वाढत्या उष्णतेमुळे रात्रीच्या वेळेतही विजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. शहरातील अनेक घरांमध्ये थंडावा मिळावा यासाठी शीतकरण यंत्रणा रात्रभर सुरू ठेवली जात असल्याने वीज वापराचा आलेख सातत्याने वर जात आहे. शहरातील नवीन निवासी संकुले, व्यापारी आस्थापने आणि लघुउद्योगांची वाढ यामुळेही विजेच्या मागणीत लक्षणीय वाढ होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

विजेचा वापर काटकसरीने करावा

महावितरणचे अधिकारी यांनी नागरिकांना वीजेचा वापर काटकसरीने करण्याचे आवाहन केले आहे. भविष्यातील वाढती मागणी लक्षात घेता वीज वितरण व्यवस्था सक्षम करण्यासाठी विविध उपाययोजना राबवण्यात येत असून, नवीन यंत्रणा उभारणी, अतिरिक्त वाहिन्या आणि देखभाल कामांनाही गती देण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वाढत्या तापमानामुळे येत्या काही दिवसांत विजेची मागणी आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT