विरार : डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यांसह डासांमुळे होणाऱ्या আজारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून विशेष प्रतिबंधत्मक मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान फॉगिंग, औषध फवारणी, अळी सर्वेक्षण व निर्मूलन तसेच डासांची उत्पत्तीस्थळे शोधून त्यावर प्रतिबंधत्मक उपाययोजना करण्याचे काम करण्यात येत आहे.
पालिका क्षेत्रातील सोसायट्या, चौक, सार्वजनिक ठिकाणे, शासकीय कार्यालये, आरोग्य केंद्र तसेच गर्दीच्या परिसरात जनजागृतीपर पोस्टर्स लावण्यात आले आहेत. आतापर्यंत ४१ हजार २२१ जनजागृतीपर पोस्टर्स लावण्यात आले असून, सोसायटी व कॉर्नर मीटिंगच्या माध्यमातून नागरिकांना डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. एडीसी डासांची पैदास प्रामुख्याने साचलेल्या स्वच्छ पाण्यात होत असल्याने नागरिकांनी घराच्या परिसरात पाणी साचणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.
घरातील पाण्याच्या टाक्या, ड्रम, बांदल्या यांसह कुंड्या, टायर, वाट्या आणि इतर भांड्यांमध्ये पाणी साचून राहणार नाही, याची नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. दर आठवड्याला किमान एक दिवस 'ड्राय डे' पाळण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. बांधकाम सुरू असलेली ठिकाणे, भंगार व टायरची दुकाने, नर्सरी तसेच सोसायटी परिसरात डासांची उत्पत्ती आढळल्यास संबंधितांना सूचना व नोटिसा देण्यात येत आहेत. त्यानंतरही पुन्हा अळी आढळल्यास नियमानुसार संबंधितांवर दंडात्मक तसेच आवश्यक कायदेशीर केली जाणार आहे.
डासजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केवळ महापालिका प्रशासनाच्या प्रयत्नांबरोबरच नागरिकांचा सहभागही महत्त्वाचा आहे. त्यामुळे परिसर स्वच्छ ठेवणे, कुठेही पाणी साजू न देणे आणि डासांची उत्पत्ती होऊ नये यासाठी आवश्यक उपाययोजना करणे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.