Vasai Virar Sewage Project Pudhari
पालघर

Vasai Virar Sewage Project: बोळिंजमधील 385 कोटींचा प्रकल्प धोक्यात; भ्रष्टाचाराच्या आरोपांनी महासभा तापली

30 एमएलडी प्रकल्प ठप्प; सांडपाणी थेट खाडीत, आरोग्य व पर्यावरणावर गंभीर परिणाम

पुढारी वृत्तसेवा

वसई : वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या बोळिंज येथील 30 एमएलडी क्षमतेच्या मलनिस्सारण प्रकल्पाची दुरवस्था आणि त्यामध्ये झालेला कोट्यवधींचा भ्रष्टाचार शुक्रवारी झालेल्या महासभेत गाजला. विरोधी पक्षनेते मनोज पाटील यांनी या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि प्रशासनाला धारेवर धरले. तब्बल 385 कोटी रुपये खर्च करून उभारलेल्या या प्रकल्पाचे स्ट्रक्चर अवघ्या 9 वर्षांतच सडून गेले असून बीम आणि पिलर कोसळत असल्याची धक्कादायक माहिती त्यांनी सभागृहात मांडली.

ज्या प्रकल्पाचे आरसीसी स्ट्रक्चर किमान 50 वर्षे टिकणे अपेक्षित होते, तो प्रकल्प इतक्या लवकर नादुरुस्त कसा झाला, असा सवाल करत त्यांनी या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मनोज पाटील यांनी या प्रकल्पावर श्वेतपत्रिका काढण्याची आणि संबंधित सल्लागार तसेच कंत्राटदारांवर गुन्हे दाखल करण्याची आक्रमक मागणी महापौर अजीव पाटील यांच्याकडे केली आहे.

या प्रकल्पाच्या तांत्रिक बिघाडामुळे पर्यावरणाचे आणि जनतेच्या आरोग्याचे अतोनात नुकसान होत असल्याचे मनोज पाटील यांनी निदर्शनास आणून दिले. प्रकल्पाची क्षमता 30 एमएलडी असताना आज केवळ 8 एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते, तर उर्वरित पाणी थेट खाडीत सोडले जात आहे. विशेष म्हणजे, गेल्या 25 दिवसांपासून हा प्रकल्प पूर्णपणे बंद असून सांडपाणी विनाप्रक्रिया समुद्रात सोडले जात आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निकषानुसार जिथे दररोज 2 टन ओला गाळ निघायला हवा, तिथे केवळ 5 किलो गाळ निघत असल्याचे सांगत पाटील यांनी प्रकल्पातील प्रक्रियेच्या नावाखाली सुरू

असलेला बनाव उघड केला.प्रशासकीय अनास्थेमुळे एनजीटी आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कोट्यवधींचा दंड भरावा लागत आहे, जो सामान्य जनतेच्या खिशातून जात आहे. या प्रकल्पासाठी वापरलेले साहित्य निकृष्ट दर्जाचे असून स्टेनलेस स्टीलऐवजी माईल्ड स्टील वापरल्याने यंत्रणा सडली असल्याचा आरोपही त्यांनी केला. 2 कोटींचा निधी परत जाऊ नये म्हणून दुरुस्तीचे प्रस्ताव आणण्यापेक्षा या प्रकरणाची चौकशी होणे गरजेचे आहे. मनोज पाटील यांनी या प्रकल्पावर श्वेतपत्रिका काढण्याची व संबंधित सल्लागार तसेच कंत्राटदारांवर गुन्हे दाखल करण्याची आक्रमक मागणी महापौरांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT