पालघर

Vasai rain update : वसईत जोरदार पाऊस, पुराच्या पाण्यात वाहून गेल्या दोन कार

चालकाने प्रसंगावधान राखून वाचवला जीव; राजावळी परिसरातील थरारक घटना

पुढारी वृत्तसेवा

खानिवडे : गेल्या दोन दिवसांपासून वसई-विरार शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून ओहोळ नाले दुथडी भरून वाहत आहेत. या पार्श्वभूमीवर वसई पूर्वेतील राजावळी येथील वाघराळ पाडा परिसरात बुधवारी घडलेल्या थरारक घटनेत मोठ्या नाल्याच्या पुराच्या वेगवान प्रवाहात दोन चारचाकी वाहने वाहून गेली. सुदैवाने यातील एका कारमधील चालकाने प्रसंगावधान राखत वेळेत बाहेर उडी मारल्याने त्याचा जीव थोडक्यात बचावला.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. त्यामध्ये पावसाच्या प्रचंड प्रवाहात दोन कार वाहून जाताना दिसत आहेत. त्यापैकी एका व्हॅगनार कारमध्ये चालक बसलेला होता. पाण्याचा वेग इतका प्रचंड होता की कार काही अंतरापर्यंत वाहत गेली आणि पादचाऱ्यांसाठी उभारलेल्या छोट्या पुलाला जोरदार धडकली. या धडकेमुळे पुलाचेही नुकसान झाले.

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून चालकाने योग्यवेळी कारमधून उडी मारल्याने मोठा अनर्थ टळला. अन्यथा ही घटना जीवघेणी ठरली असती. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले आणि जेसीबीच्या साहाय्याने वाहून गेलेल्या वाहनांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू करण्यात आले.

दरवर्षी वाघराळ पाडा परिसरात पावसाचे पाणी साचून नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. मात्र यंदा थेट दोन कार पुराच्या प्रवाहात वाहून गेल्याने या भागातील जलनिस्सारण व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. स्थानिक नागरिकांनी या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.

प्रसंगावधानामुळे टळली मोठी दुर्घटना

पुराच्या वेगवान प्रवाहात कार वाहून जात असतानाच चालकाने क्षणाचाही विलंब न करता वाहनातून बाहेर उडी घेतली. त्याच्या धाडस आणि प्रसंगावधानामुळे जीवितहानी टळली. मात्र, या घटनेने पावसाळ्यात पुरग्रस्त भागातून वाहन चालविताना अत्यंत सावधगिरी बाळगण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT