वसई : वसईतील पोलीस यंत्रणा, भूमाफिया आणि बड्या विकासकांमध्ये निर्माण झालेल्या कथित घनिष्ठ संबंधांमुळे सामान्य नागरिकांना न्याय मिळणे कठीण झाले असून, या अन्यायाचा निषेध करण्यासाठी वसईकर भूमिपुत्रांनी गळ्यात फास लटकावित व शवपेटी हातात घेत स्वतःचीच अंतयात्रा आज काढली. वसईकर नागरिकांचे हे अनोखे आणि हृदयद्रावक आंदोलन रोखण्यासाठी पोलिसांनी जमावबंदीचा आदेश पुढे करून आंदोलन रोखता येईल का? याचा केविलवाणा प्रयत्न केला. जर न्याय मिळत नसेल तर आम्हाला एकदाचा मृत्यूदंडच द्या, अशी मागणीच आम्ही करीत असून, तर जमावबंदी काय म्हणता? आम्हाला एकदाचे मारूनच टाका, अशी आर्त हाक देत वसईकर नागरिक स्वतःचीच अंत्ययात्रा काढून पोलीस उपायुक्त (झोन 2) यांच्या कार्यालयासमोर हे आंदोलन छेडले व पोलिस प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले.
सध्या वसई-विरारमध्ये भूमाफिया आणि धनदांडग्या विकासकांचे वर्चस्व वाढले असून पोलीस यंत्रणा त्यांच्या दबावाखाली किंवा हितसंबंधांमुळे सर्वसामान्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र वारंवार समोर येत आहे. अनेकदा जमिनी बळकावणाऱ्या विकासकांविरुद्ध तक्रार करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याची दखल घेतली जात नाही, उलट आपली हक्काची जमीन वाचवू पाहणाऱ्या मूळ जमीन मालकावरच खोटे गुन्हे दाखल केले जातात. अधिकार पदाचा अमर्याद वापर करून सामान्यांवर प्रतिबंधात्मक कारवाया किंवा हद्दपारीसारखी गंभीर पावले उचलली जात असल्याच्या तक्रारी समाजात मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत.
पोलिसांकडून होणाऱ्या या मानसिक आणि कायदेशीर त्रासामुळे भूमिपुत्रांच्या अस्तित्वावरच गदा आली असून, जणू या यंत्रणेने नागरिकांच्या अस्तित्वाविरुद्ध मृत्युदंडच ठोठावला आहे, अशी भावना आंदोलकांनी व्यक्त केली आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून भूमाफिया, विकासक आणि पोलीस यंत्रणेच्या अभद्र युतीमुळे समाजासमोर उभ्या राहिलेल्या गंभीर आव्हानांकडे शासनाचे लक्ष वेधले गेले. यावेळी नायगाव, जुचद्र, वसई माणिकपूर, पेल्हार, सोपारा आदी भागातील अनेक पीडित नागरिकांनी आपल्या व्यथा मांडल्या.
जनतेच्या वतीने पोलीस उपायुक्त (झोन 2) अधिकारी पौर्णिमा चौगुले यांनी सर्व म्हणणे व तक्रार ऐकून घेतल्या. ज्या ज्या पोलिसांच्या विरोधात तक्रारी असतील त्याबाबत लेखी निवेदन देण्यात यावे. त्यावर तत्काळ चौकशी करून कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिल. सोबत शेतकरी भूमिपुत्र यांच्यावर अन्याय केला जाणार नाही व याबाबत प्रत्येक महिन्यातून एकदा पोलिस - नागरिक असा जनता दरबार आयोजित करण्यात येईल असेही त्यांनी नमूद केले. वसई विरार जनशक्ती आघाडीचे मॅकेन्झी डाबरे, अनिल चव्हाण, डॉमिनिका डाबरे, सुमित डोंगरे, फादर मायकल जी, वेरोनिका रिबेलो व शेकडो कार्यकर्त्यांनी सदर आंदोलनाचे नेतृत्व केले.