Vasai betel leaf farming pudhari photo
पालघर

Vasai betel leaf farming : वसईच्या सुप्रसिद्ध नागवेली पानाला लागली घरघर

केळवा-माहिमने जपली परंपरेची हिरवी शान

पुढारी वृत्तसेवा

खानिवडे : विश्वनाथ कुडू

एकेकाळी वसईच्या आर्थिक समृद्धीचे प्रमुख आधारस्तंभ ठरलेली आणि लाहोर-पेशावरपर्यंत नावाजलेली वसईची नागवेलीची विड्याची पाने आज अस्तित्वाच्या लढाईत सापडली आहेत. वाढती उत्पादनखर्च, मजुरांची टंचाई, कारवी-बांबूचा तुटवडा आणि बदलती शेती पद्धती यामुळे वसईतील पानशेती जवळपास नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. दुसरीकडे, पालघर तालुक्यातील केळवा-माहिम परिसरातील शेतकऱ्यांनी ही परंपरा जपली असून आजही सुमारे शेकडो शेतकरी पानशेती करून या व्यवसायाला टिकवून धरत आहेत.

१८८० च्या सुमारास वसईत सुरू झालेल्या पानशेतीने पहिल्या महायुद्धानंतर मोठी भरभराट केली होती. विड्याची पाने हे वसईतील बागायतदारांचे प्रमुख उत्पन्नाचे साधन बनले होते. या व्यवसायामुळेच वसई आणि केळवा-माहिम परिसरातील बागायतदारांना 'वाडवळ' ही ओळख मिळाल्याचे ज्येष्ठांकडून सांगितले जाते.

मात्र १९२० च्या दशकात पानवेलीवर आलेल्या 'मर' या रोगाने या व्यवसायाला मोठा फटका बसला. त्यानंतर उत्पादन झपाट्याने घटले आणि अनेक शेतकऱ्यांनी पानशेतीला कायमचा रामराम ठोकला. आज वसईतील अवघे दोन-चार शेतकरी हा वारसा जिवापाड जपत आहेत. पूर्वी होळीबाजार येथे भरणारा पानांचा मोठा बाजारही आता इतिहासजमा झाला आहे.

याउलट केळवा-माहिममधील शेतकऱ्यांनी संघटित पद्धतीने व्यवसाय सुरू ठेवला आहे. 'केळवा पान कंपनी' आणि 'महिकावती पान कंपनी'च्या माध्यमातून पानांच्या पाट्या थेट सौराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातील व्यापाऱ्यांपर्यंत पोहोचवल्या जात आहेत. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांना वसईपेक्षा अधिक दर मिळत असल्याचे समोर आले आहे.

नागवेलीची पाने तोडल्यानंतर तीन-चार दिवसांच्या आत बाजारात पोहोचवावी लागतात. बीजला, हाडकं, मोडवण आणि खरावण अशा चार दर्जांमध्ये त्यांची वर्गवारी केली जाते. पालघर जिल्ह्यातील पान चवीला तिखट असल्याने महाराष्ट्रात त्याची मागणी तुलनेने कमी असली, तरी गुजरात, सौराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातील अनेक शहरांत त्याला मोठी मागणी आहे.

काळाच्या ओघात वसईची ओळख बनलेली पानशेती लुप्त होत असताना, या ऐतिहासिक कृषी वारशाच्या संवर्धनासाठी शासनाने विशेष योजना राबविण्याची तसेच उर्वरित पान उत्पादकांना आर्थिक व तांत्रिक मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. अन्यथा, वसईची ऐतिहासिक ओळख असलेली 'पानवेल' येत्या काही वर्षांत केवळ इतिहासाच्या पानांतच उरेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT