Vasai Marine pollution is becoming dangerous for aquatic life
खानिवडे : पुढारी वृत्तसेवा
वसई समुद्रातील प्रदूषण आता परमोच्च टोकावर पोहोचले असून मागील काही वर्षात लाखो समुद्री जीव मृतप्राय अवस्थेत येथील किनाऱ्यावर आढळले आहेत. मागील वर्षी महाकाय देवमासा अर्नाळा किल्ल्या नजिक सापडला होता. त्यानंतर समुद्री कासवे व अन्य जलचर दररोज वसई किनाऱ्यावर मृतावस्थेत दाखल होत आहेत. नुकतेच एक डॉल्फिन माश्याचे पिल्ल राजोडी किनाऱ्यावर आढळून आले आहे. एका पर्यटकाने त्याचे व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारित केल्यावर जीवरक्षक जनार्दन मेहेर यांनी या पिल्लाचे पार्थिव किनाऱ्या लगत खड्डा खोदून पुरले. त्यामुळे किनाऱ्यावर पसरलेली दुर्गधी व जल प्रदूषण टळले आहे. वास्तविक पहाता ही संपूर्ण प्रक्रिया करण्याची जबाबदारी वन विभागाची आहे. वसई वन विभाग याकामी विशेष स्वारस्य दाखवत नसल्याचे अनेकदा सिद्ध झाले आहे.
महाराष्ट्र राज्याला मोठा समुद्र किनाला लाभलेला आहे. हा समुद्रकिनारा देशात सर्वाधिक प्रदूषित आहे, असा निष्कर्ष गोव्याच्या राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्थेने आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने संयुक्त अहवालात नुकताच काढला आहे. पश्चिम किनारपट्टीवरील सागरजलाचे ११०० नमुने घेऊन त्यांच्या अभ्यासा नंतर हे अनुमान काढल्याचे या संस्थांनी म्हटले आहे.
या अहवालानुसार संपूर्ण पश्चिम किनाऱ्यापैकी महाराष्ट्राची ७२० किमी लांबीची किनारपट्टी सर्वांत जास्त प्रदूषित आहे. त्यातही मुंबई, गुजरातच्या किनाऱ्यावर हे प्रमाण लक्षणीय आहे. नदीमुखे आणि खाड्या हे किनाऱ्यावरील प्रदेश प्रदूषणामुळे जास्त बाधित आहेत, तेलगळती हा सागरी प्रदषणाचा आणखी एक धोकादायक प्रकार आहे. २०१० च्या समुद्रातील तेलगळतीचा वतेलतवंगाचा महाराष्ट्राच्या किनारी पर्यावरणावर दूरगामी परिणाम झाला आहे.
किनारी व सागरी प्रदूषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन, औद्योगिक, रासायनिक, दुषित पदार्थांवर व तेलगळतीवर नियंत्रण अशा अनेक उपायांची गरज पश्चिम किनारपट्टीवरील गावांना जाणवते आहे. अनिबंध उद्योगीकरण, रासायनिक आणि तेल कंपन्यांकडून समुद्रात जाणारे दूषित पाणी, नाल्यातील सांडपाणी या सगळ्यांचा परिणाम जैववैविध्यतेवर होत आहे.
मुंबईपासून ३० ते ५० किमी दूर समुद्रात प्राणवायूच नसल्यामुळे तिथे मासेही आढळत नाहीत. मुंबईपासून दीवपर्यंतच्या समुद्रात अतिघातक विषाणू असल्यामुळे तिथे जीवसृष्टी शिल्लक राहणेच अशक्य असल्याचे निरीक्षण संयुक्त अहवालात मांडलेले आहे. मुंबई आणि उपनगरे, तारापूर, वसई, मनोरी, वसोवा, वादे, माहीम, वरळी, ठाणे, पाताळगंगा आणि अलिबाग या सर्व ठिकाणी प्रामुख्याने घरगुती सांडपाणी, उद्योगीकरण, ऊर्जा प्रकल्प यामुळेच प्रदूषणात वाढ झाल्याचे लक्षात आले आहे.
उर्वरित किनाऱ्यांवर मात्र पर्यटनामुळे, सांडपाण्यामुळे आणि सरकारी व स्थानिक पातळीवर असलेल्या असंवेदनशीलपणामुळे ही समस्या उग्र रूप धारण करीत असल्याचे दिसून येत आहे. वसईचा किनारा काही वर्षापुर्वी स्वच्छ समजला जात होता. पण आता येथील समुद्र व किनारा सागरी जीवां करिता घातक बनला आहे. त्यामुळे सन २००९ पासून मोठ्या प्रमाणात मृत मासे, कासवे, जलचर किनारा गाठत आहेत.
समुद्रातील मोठ्या जहाजामधून होणारी तेल गळती भीषण असून त्यामुळे समुद्रकिनारा व अंतर्गत भाग मोठ्या प्रमाणात जलप्रदूषित होत आहे. त्यामुळे अशा स्वरूपाचे जलचर मृत होत असून येणाऱ्या काळामध्ये समुद्र भयाण होण्याची चिन्हे असल्याची प्रतिक्रिया वसई सागरी जीव रक्षक जनार्दन मेहेर यांनी दिली आहे.