नालासोपारा : वसई शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले असून वसईमध्ये दुपारच्या सुमारास ज्वेलर्स दुकानाच्या मालकावर चाकूने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात ‘अंबिका ज्वेलर्स’चे मालक कालू सिंह गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ही घटना वसई पूर्व, वालीव येथील जय नगर परिसरात घडली. रोजच्या प्रमाणे दुकान उघडल्यानंतर दुपारी अंदाजे 12 वाजता एक अज्ञात युवक दुकानात शिरला आणि काहीही कळण्यापुर्वी कालू सिंह यांच्यावर चाकूने सतत वार केले. हल्ला इतका अचानक होता की दुकानदाराला स्वतःचा बचाव करण्याची संधीही मिळाली नाही. हल्ल्यानंतर आरोपी तत्काळ पसार झाला.
रक्तबंबाळ अवस्थेत जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. गजबजलेल्या परिसरात घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. विशेष म्हणजे, हल्लेखोराने दुकानातून कोणतीही चोरी केली नाही, त्यामुळे हल्ल्यामागील कारण अधिकच गूढ बनले आहे. पोलिसांनी प्राथमिक तपासात वैयक्तिक कारण असल्याची शक्यता देखील तपासायला सुरुवात केली आहे.
घटनेची माहिती मिळताच वालीव पोलीस, गुन्हे शाखा आणि परिमंडल-2 च्या डीसीपी पौर्णिमा चौगुले-श्रींगी तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. डीसीपी चौगुले-श्रींगी यांनी सांगितले, “आरोपीच्या शोधासाठी नाकाबंदी करण्यात आली आहे. विशेष तपास पथक तयार करण्यात आले असून आरोपीला लवकरच अटक केली जाईल.”पोलिसांनी या गंभीर हल्ल्याचा तपास सर्व दृष्टीकोनातून सुरू केला आहे.