Janjira Vasai Fort pudhari photo
पालघर

Janjira Vasai Fort : वसई किल्ल्याच्या बालेकिल्ल्याचे प्रवेशद्वाराची दुरवस्था

पुरातत्त्व विभागाच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक वारसा नामशेष होण्याच्या मार्गावर

पुढारी वृत्तसेवा

खानिवडे : पालघर जिल्ह्यातील ऐतिहासिक गड-दुर्गांमध्ये मानाचे स्थान असलेल्या जंजिरे वसई किल्ल्यातील ऐतिहासिक वास्तूंची पडझड सुरूच असून, आता बालेकिल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वारही अखेरच्या घटका मोजत आहे. पुरातत्त्व विभागाच्या कथित अनास्थेमुळे या ऐतिहासिक वास्तूचे अस्तित्वच धोक्यात आले असून, वेळीच संवर्धन न झाल्यास वसईच्या इतिहासाची आणखी एक महत्त्वपूर्ण साक्ष काळाच्या पडद्याआड जाण्याची भीती दुर्गप्रेमींकडून व्यक्त होत आहे.

जंजिरे वसई किल्ल्यातील ऐतिहासिक वास्तूंमध्ये बालेकिल्ला नामक गढीला विशेष महत्त्व आहे. साधारणतः इसवी सनाच्या बाराव्या शतकात या गढीचे बांधकाम झाल्याचे सांगितले जाते. या गढीचे मुख्य प्रवेशद्वार आज अत्यंत जीर्ण अवस्थेत असून, त्यावरील दगडी अवशेष कधीही कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रवेशद्वारावर उगवलेली अनावश्यक झाडी, ढासळणारे दगडी बांधकाम आणि देखभालीचा अभाव यामुळे या वास्तूची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत आहे.

या प्रवेशद्वारावर कोरलेली ऐतिहासिक चिन्हे, राजचिन्ह, भाल्याची चिन्हे तसेच शुभचिन्हे इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाची साक्ष मानली जातात. मात्र, पूर्वीच या प्रवेशद्वाराचे काही खांब गायब झाले असून, उर्वरित लहान खांबही आता कोसळण्याच्या स्थितीत आहेत. काही महिन्यांपूर्वी यातील एक खांब कोसळल्याने वास्तूच्या ढासळत्या अवस्थेची गंभीरता समोर आली आहे. तरीही या अवशेषांच्या संवर्धनासाठी किंवा आवश्यक डागडुजीसाठी ठोस उपाययोजना झालेली नसल्याची खंत व्यक्त होत आहे.

विशेष म्हणजे, या ऐतिहासिक वास्तूविषयी माहिती देणारा फलकही परिसरात लावण्यात आलेला नाही. किल्ल्याला भेट देणारे पर्यटक याच प्रवेशद्वाराजवळ दुचाकी उभ्या करीत असल्याने कधीही दुर्घटना होऊ शकते. पावसाळ्यात प्रवेशद्वाराजवळ मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने पर्यटकांना ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागतो. त्यातच परिसर झाडीझुडपांनी वेढलेला असल्याने स्वच्छतेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.

किल्ल्यातील अनेक वास्तूंची पडझड सुरू असताना धोकादायक वास्तूंबाबत पर्यटकांना सावध करणारे सूचना फलकही नसल्याचे दिसून येते. त्यामुळे ऐतिहासिक वारशाचे संवर्धन तर दूरच, पर्यटकांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.

संवर्धनासाठी विशेष आराखडा हवा!

इतिहास अभ्यासकांच्या मते, जंजिरे वसई किल्ल्यातील धोकादायक आणि पडझडीच्या मार्गावर असलेल्या वास्तूंचे तातडीने सर्वेक्षण करून त्यांच्या संवर्धनासाठी विशेष आराखडा तयार करणे आवश्यक आहे. ऐतिहासिक वास्तूंचे मूळ स्वरूप कायम राखून शास्त्रोक्त पद्धतीने दुरुस्ती व संवर्धन झाले पाहिजे. बालेकिल्ल्याचे प्रवेशद्वार अखेरच्या घटका मोजत असतानाही संबंधित यंत्रणेकडून ठोस पावले उचलली जात नसतील, तर ही बाब वसईच्या ऐतिहासिक वारशाच्या दृष्टीने चिंताजनक असल्याचे मत इतिहास अभ्यासकांनी व्यक्त केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT