Drowning  Pudhari
पालघर

Drown death palghar : वसईत 2 दिवसांत तिघांचा बुडून मृत्यू

अर्नाळा समुद्रातील दोन युवकांनंतर हेदवडेतील तानसा खाडीत आणखी एक बुडाला; पावसाळ्यात पाण्यात उतरताना सतर्कतेचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

खानिवडे : वसई तालुक्यात अवघ्या दोन दिवसांत तीन युवकांचा बुडून मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. गुरुवारी (दि.16) अर्नाळा समुद्रकिनारी वर्षासहलीदरम्यान दोन युवकांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, शुक्रवारी (दि.18) तानसा खाडीत बुडालेल्या युवकाचा मृतदेह शनिवारी सकाळी सापडल्याने पावसाळ्यातील जलप्रवाह किती धोकादायक ठरू शकतात, याची पुन्हा प्रचिती आली आहे.

वसई पूर्वेतील पेल्हार येथील रहिवासी संजू तुकाराम गवते (वय ३४) हा हेदवडे येथे आपल्या मावशीकडे आला होता. शुक्रवारी सायंकाळी तो गावालगतच्या तानसा खाडीत आंघोळीसाठी उतरला. मुसळधार पावसामुळे खाडीला आलेल्या तीव्र प्रवाहाचा अंदाज न आल्याने तो पाण्यात वाहून गेला आणि बुडाला.

घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी आरडाओरडा करत त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही क्षणांतच तो पाण्यात दिसेनासा झाला. माहिती मिळताच मांडवी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम सुरू केली. मात्र, अंधार पडल्याने शोधकार्य थांबवावे लागले. शनिवारी पहाटे नातेवाईक आणि स्थानिक नागरिकांनी पुन्हा शोधमोहीम सुरू केली. ज्या ठिकाणी संजू बुडाला होता, त्याच परिसरात त्याचा मृतदेह आढळून आला. नदीकाठी त्याने काढून ठेवलेले कपडेही मिळून आले. मांडवी पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून पुढील तपास सुरू आहे.

पावसाळ्यात पाण्यात उतरताना खबरदारी घ्या; प्रशासनाने आवाहन

दरम्यान, गुरुवारी अर्नाळा समुद्रकिनारी वर्षासहलीसाठी गेलेल्या चार युवकांपैकी दोघांना जीवरक्षकांनी वाचवले होते, तर दोघांचा बुडून मृत्यू झाला. त्यानंतर अवघ्या काही तासांत तानसा खाडीत आणखी एका युवकाचा जीव गेल्याने वसई तालुक्यात दोन दिवसांत तीन युवकांचा बळी गेल्याची दुर्दैवी नोंद झाली आहे. पावसाळ्यात नद्या, खाड्या, समुद्रकिनारे आणि धबधब्यांवरील पाण्याचा वेग व खोलीचा अंदाज घेणे कठीण असते. त्यामुळे वर्षा पर्यटनाचा आनंद घेताना प्रवाहित पाण्यात उतरू नये, जीव धोक्यात घालू नये आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन पोलीस व प्रशासनाने नागरिकांना केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT