पालघर ः महामार्गालगतच्या एका रिसॉर्ट जवळ वैतरणा नदीचा काठ खचल्यामुळे पाईपलाइन पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली आहे. त्यामुळे मनोर गावाचा पाणीपुरवठा बंद झाला आहे.जोरदार पाऊस, नदीला आलेला पूर आणि पाण्याच्या प्रवाहामुळे भूस्खलनाची शक्यता असल्याने जलवाहिनीच्या दुरुस्तीला दोन आठवड्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. पाणीपुरवठा बंद झाल्याने पावसाळ्यात मनोरकरांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.
मनोर गावच्या पाणीपुरवठा योजनेला वैतरणा नदीवरील रिसॉर्ट लगतच्या बंधाऱ्यातून पाणीपुरवठा केला जातो. रिसॉर्ट लगत वैतरणा नदी पात्रात बांधलेल्या जॅकवेल मधून नदीच्या काठावरून बारा इंच व्यासाची जलवाहिनी टाकून वैतरणा नदीचे पाणी मनोरच्या मुख्य साठवण टाकीत आणले जाते.
पालघर जिल्ह्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे वैतरणा नदीला पूर आला होता.मंगळवारी सायंकाळी पुराच्या पाण्याच्या प्रवाहामुळे बंधाऱ्याच्या खालच्या बाजूकडील नदीचा काठ खचून काठाची माती नदी पात्रात वाहून गेल्याने मनोरच्या पाणीपुरवठा योजनेची जलवाहिनी पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली आहे.माती अभावी जलवाहिनीला आधार नसल्याने दोन पाइप मधील सांधा निखळून जलवाहिनी नादुरुस्त झाली आहे.
बंधाऱ्याच्या खालच्या बाजूकडील नदीचा काठच्या 15 ते 20 फूट खोल आणि 30 ते 40 फूट रुंद भागातील माती वाहून गेल्याची माहिती ग्रामपंचायत प्रशासनाने दिली आहे.जलवाहिनी दुरुस्तीच्या कामासाठी 10 ते 12 दिवसांचा कालावधी लागणार असल्याची माहिती ग्रामपंचायत प्रशासनाने दिली आहे. जोरदार पाऊस,पुर आणि नदी काठच्या भूस्खलनामुळे नादुरुस्त जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामात अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे.मनोर गावाचा पाणीपुरवठा दोन आठवडे बंद राहण्याची शक्यता असल्याने ग्रामस्थांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.
कोटींचा खर्च
चार कोटी 35 लाख रुपये खर्च करून मनोरच्या पाणीपुरवठा योजनेच्या बंधाऱ्यांची उंची वाढवण्यात आली आहे. चार लाख 20 हजार लिटर पाणी साठवण क्षमता असलेली टाकी, दीड लाख लिटर आणि साठ हजार लिटर क्षमतेच्या दोन साठवण टाक्या, जकवेल पासून मुख्य साठवण टाकी पर्यंत 12 इंचाची नवीन जलवाहिनी आणि साठवण टाकीतून गावातील वितरणासाठी नवीन जलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत.