Vadhvan Port Hill Cutting AI image
पालघर

Vadhvan Port Hill Cutting - वाढवण बंदरासाठी डोंगर फोडण्याची तयारी

तीन दगड खाण प्रकल्पांवर २ ऑगस्टला जनसुनावणी

पुढारी वृत्तसेवा

बोईसर : वाढवण बंदर प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या भराव साहित्याच्या उपलब्धतेसाठी पालघर जिल्ह्यातील गारगाव आणि खानिवडे परिसरातील तीन दगड खाण प्रकल्पांवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) २ ऑगस्ट रोजी सार्वजनिक जनसुनावणी आयोजित केली आहे. मात्र, वाढवण बंदर प्रकल्पाबाबत जिल्ह्यात आधीपासूनच असलेल्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर डोंगर फोडून मोठ्या प्रमाणावर दगडांचे उत्खनन करण्याच्या प्रस्तावामुळे नागरिकांमध्ये असंतोष अधिक वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.

एमपीसीबीचे सदस्य सचिव राहुल रेखवार (आयएएस) यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण (जेएनपीए) हे या तीनही दगड खाण प्रकल्पांचे प्रस्तावक आहेत. बोईसर पूर्वेकडील गारगाव येथील २४.९४ हेक्टर व १७.०८ हेक्टर तसेच खानिवडे येथील १५.३९ हेक्टर क्षेत्रात दगड खाणी विकसित करण्याचा प्रस्ताव आहे. या तिन्ही खाणींमधून दरवर्षी एक कोटीहून अधिक टन दगडांचे उत्खनन करण्यात येणार असून, त्याचा वापर वाढवण बंदराच्या समुद्रातील भरावासाठी केला जाणार आहे. जनसुनावणीसाठी पालघर जिल्हाधिकारी अथवा त्यांचे प्रतिनिधी अध्यक्ष असतील. एमपीसीबी ठाणेचे प्रादेशिक अधिकारी सदस्य, तर

एमपीसीबी तारापूर-२ चे उपप्रादेशिक अधिकारी समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत. शिगाव (खुटाड) येथील जीवन शिक्षण संस्थेच्या अनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या मैदानावर २ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता पहिल्या गारगाव प्रकल्पाची, दुपारी १.३० वाजता दुसऱ्या गारगाव प्रकल्पाची आणि सायंकाळी ४.३० वाजता खानिवडे प्रकल्पाची जनसुनावणी होणार आहे.

या जनसुनावणीत स्थानिक ग्रामस्थ, शेतकरी, आदिवासी, पर्यावरणप्रेमी तसेच विविध सामाजिक संघटनांना हरकती, सूचना आणि मते नोंदवण्याची संधी मिळणार आहे. डोंगर पोखरून मोठ्या प्रमाणात उत्खनन झाल्यास पर्यावरणीय समतोल, भूजल पातळी, धूळप्रदूषण, अवजड वाहनांची वाहतूक, शेती आणि स्थानिक जनजीवनावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

वाढवण बंदर प्रकल्पाच्या विरोधात जिल्ह्यात यापूर्वीही अनेक आंदोलने, मोर्चे आणि ग्रामसभांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती. आता बंदरासाठी डोंगर फोडून दगड काढण्याचा प्रस्ताव समोर आल्याने स्थानिक नागरिकांचा विरोध आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT