सफाळे ःकेळवेरोड रेल्वे स्थानकाच्या पूर्व भागात राहणाऱ्या नागरिकांसाठी मूलभूत पायाभूत सुविधांचा प्रश्न अद्यापही प्रलंबित असून, पश्चिम रेल्वेने माहिती अधिकारांतर्गत दिलेले उत्तर हे अत्यंत असमाधानकारक व जबाबदारी टाळणारे असल्याचा आरोप प्रवासी संघटनांनी केला आहे.
केळवेरोड स्थानकाच्या पूर्व परिसरात बंदाठे, झांझरोळी तसेच डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणावर आदिवासी समाजासह इतर समाजातील नागरिक वास्तव्यास आहेत. या नागरिकांना शाळा, बाजारपेठ, दवाखाना किंवा रेल्वे प्रवासासाठी तिकीट काढायचे असल्यास स्थानकाच्या पश्चिम बाजूस जावे लागते. त्यासाठी उंच, लांब व झिगझॅग पद्धतीने बांधलेल्या पादचारी पुलावरून प्रवास करावा लागतो किंवा तब्बल एक ते दीड किलोमीटर अंतर पायी चालावे लागते.
याचा सर्वाधिक त्रास ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग, शालेय विद्यार्थी व आजारी रुग्णांना सहन करावा लागत आहे.या पार्श्वभूमीवर केळवेरोड स्थानकावर मंजूर झालेल्या पादचारी पूल, लिफ्ट, एस्केलेटर व इतर मूलभूत सुविधांबाबतची माहिती डहाणूवैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेचे जनसंपर्क अधिकारी हितेश सावे यांनी अंतर्गत मागवली होती. मात्र, पश्चिम रेल्वेने दिलेल्या उत्तरात कोणतीही ठोस तारीख किंवा निश्चित कालावधी नमूद न करता जबाबदारी एकमेकांवर ढकलल्याचे स्पष्ट झाले आहे.
प्रवाशांच्या मते, वैतरणा ते डहाणू दरम्यानच्या बहुतेक स्थानकांवर पूर्व बाजूस असलेले उंच झिगझॅग पूल ही नवी समस्या नसून, वर्षानुवर्षे प्रवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. याच कारणामुळे यापूर्वी सफाळे स्थानकावर उपोषणासह आंदोलन करण्यात आले होते.
प्रवासी संघटनेच्या ठाम मागण्या
डहाणू-वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेने पुढील मागण्या लावून धरल्या आहेत
पश्चिम रेल्वे व यांनी आपापली जबाबदारी स्पष्ट करावी
प्रत्येक स्थानकासाठी लिफ्ट व एस्केलेटरचे ठोस व लेखी वेळापत्रक जाहीर करावे
प्रकल्पाच्या प्रत्येक टप्प्यासाठी निश्चित टाइमलाइन देऊन नियोजनबद्ध अंमलबजावणी करावी.